
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सरकारच्या "स्टार्टअप इंडिया" आणि "मेक इन इंडिया" उपक्रमांना चालना देण्यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे आयडिया स्पार्क इनोव्हेशन चॅलेंज २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले...
यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर अध्यक्ष मनिष कोठारी, संचालक विक्रम सारडा, संचालक नरेंद्र गोलिया, संचालक नरेंद्र बिरार, सीईओ एस. के. माथुर उपस्थित होते. यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे आयडिया स्पार्क इनोव्हेशन चॅलेंज -२०२३ बद्दल माहिती देतांना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले की, या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने देखील पुढाकार घेतला असून शहरी भागासह ग्रामीण भागातून देखील नवउद्योजकांच्या संकल्पनांना यातून वाव मिळणार आहे.
गेल्या वर्षी या १८० जणांनी आपल्या संकल्पना व आपली प्रयोग यामध्ये सादर केले होते तर यावर्षी ३०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविण्याकरिता एनईसी प्रयत्नशील आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन संकल्पनांना किंवा स्टार्टअपला एक लाख रुपयांचे एकत्रित पारितोषिक ठेवण्यात आले आहेत.
यावेळी बोलतांना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर संचालक नरेंद्र गोलिया यांनी सांगितले की, या ठिकाणी सादर होणाऱ्या संकल्पनांना पुढे वाव मिळण्यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शनदेखील करण्यात येणार असून दरवर्षी ग्रामीण भागातून किमान चार ते पाच जणांनी देखील स्टार्टअपच्या दृष्टीने आपल्या संकल्पना सादर केल्या तरी कालांतराने मोठ्या प्रमाणावर उद्योजक घडायला मदत होईल.
यावेळी सीईओ एस. के. माथुर यांनी सांगितले की, आयडिया स्पार्क इनोव्हेशन चॅलेंज - २०२३ साठी ५ ऑक्टोबरपर्यंत https://tinyurl.com/ideaspark2023 या लिंकवर जाऊन किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपला फॉर्म भरावा.
ही स्पर्धा विनामूल्य आहे. जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग नोंदवावा व "स्टार्टअप इंडिया" आणि "मेक इन इंडिया" च्या या उपक्रमांना यशस्वी करावे, असे आवाहन संचालक विक्रम सारडा यांनी केले.