नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांना यंदा विलंब झाला आहे. मात्र बोर्डाशी संलग्न शाळांचे शैक्षणिक सत्र वेळेत सुरू होणार आहे. काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ही घोषणा केली आहे. बोर्डाशी संलग्न शाळांचे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्याच्या मध्यावर आणि जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल. बोर्डाने शाळांच्या प्राचार्यांना पाठवलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

शहरी भागातील काही आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य शाळा त्या-त्या वेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेणार आहेत. सध्याच्या करोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम २०२० च्या संपूर्ण शैक्षणिक वर्षावर झाला आहे.

म्हणूनच पुढील वर्ष नियमितपणे सुरू व्हावे असे शिक्षक, विद्यार्थी, पालकांना वाटत आहे. बोर्डाचाही तसाच प्रयत्न आहे. शाळांकडून २०२१-२२ या शैक्षणिक सत्राबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने शाळा चिंतेत आहेत. सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार आहे.