रुग्णांची स्थिती मी स्वतः अनुभवली!

बडगुजर यांनी सांगितली करोना केंद्र उभारणीची प्रेरणा..
रुग्णांची स्थिती मी स्वतः अनुभवली!

नाशिक । प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी मला करोनाचा संसर्ग झाला होता. मी एका खासगी रुग्णालयात 15 दिवस दाखल होतो. आवश्यक ते सगळे उपचार केले गेले आणि मी बरा झालो. त्यामुळे मी करोना रुग्णांची परिस्थिती स्वानुभवातून समजावून घेऊ शकतो.

किती दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागते? उपचारांचा खर्च किती येतो हे मी स्वतः अनुभवले आहे. अनेकांची परिस्थिती साधारण असते. ते हा खर्च कसा करू शकतील? खासगी रुग्णालयात उपचार कसे घेऊ शकतील? असा प्रश्न मला पडला. त्यावरुनच मला सामान्यांसाठी हे करोना केंद्र उभारायची प्रेरणा मिळाली.

नवीन नाशिकमधील नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देशदूतशी संवाद साधतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी नवीन नाशिकमधील खासगी डॉक्टर्स, महापालिका आणि ते स्वतः असे लोकसहभागातून करोना केंद्र उभारले आहे. त्या केंद्राची 65 रुग्णांची क्षमता आहे. डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक मिळून 35 जण तेथे सध्या कार्यरत आहेत. विशेषज्ञ सकाळ-संध्याकाळ भेट देतात. काही डॉक्टर्स दिवसभर केंद्रात असतात. या केंद्रात काही प्राणवायूची सुविधा असलेल्या आणि काही साध्या खाटा आहेत.

हे केंद्र उभारण्याचे अजून एक कारण आहे. मला दिवसभरात किमान 25 तरी फोन यायचे. येतात. प्राणवायू आणि जीवरक्षक प्रणाली ( व्हेन्टिलेटर्स) ची सुविधा असलेल्या रुग्णालयात तर गंभीर अवस्था नसलेल्यांची साध्या रुग्णालयात सोय करून द्या हीच त्यांची मागणी असायची.

त्यावेळी मी फार तर 10-12 लोकांची सोय करून देऊ शकायचो. बाकीच्यांना नाईलाजाने नाही म्हणावे लागायचे. कारण कुठेच सोय उपलब्ध व्हायची नाही. समाजाच्या सहकार्याने ही उणीव थोड्याफार प्रमाणात दूर करू शकतो असे मला वाटले. मला खासगी डॉक्टर्स, महापालिका आणि नागरिकांनी मनापासून साथ दिली. त्यामुळेच अगदी थोड्या दिवसात हे केंद्र कार्यरत झाले असेही बडगुजर यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com