नवीन बिटको रुग्णालयासाठी अतिरिक्त शंभर कर्मचारी होणार उपलब्ध

खासदार गोडसेंची माहिती; रुग्णांना मिळणार वेळेवर उपचार
नवीन बिटको रुग्णालयासाठी अतिरिक्त शंभर कर्मचारी होणार उपलब्ध

नाशिकरोड । Nashik

शहर व परिसरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येचा विस्फोट झाला आहे. शहरातील नवीन बिटको कोविड सेंटरमध्ये तब्बल साडेसातशे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मात्र या रुग्णांवर उपचारासाठी केवळ शंभर कर्मचाऱ्यांचा स्टॉप उपलब्ध असल्याने आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याच समस्येची गंभीर दखल घेवून खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयतत्नातून जुन्या बिटको रुग्णालयातील दीडशे पैकी शंभर कर्मचाऱ्यांची नवीन बिटको रुग्णालयात नेमणुका करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नवीन बिटको रुग्णालयात शंभर ऐवजी दोनशे कर्मचारी रुग्णांना सेवा देणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

नाशिकरोड येथे मनपाने नव्याने उभारलेल्या नवीन बिटको रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी सध्यास्थितीत तब्बल साडेसातशे रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहेत. याशिवाय केवळ शंभर कर्मचारी असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचारासाठी प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. याविषयीच्या अनेक तक्रारी खा. गोडसे यांच्याकडे आल्या होत्या.

याची दखल घेत खा. गोडसे यांनी आज बिटको रुग्णालयात जावून वस्तुस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट होताच खा. गोडसे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत चर्चा केली. खा. गोडसे यांनी मांडलेल्या समस्यांमध्ये तथ्य असल्याने आयुक्त जाधव यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी नागरगोजे यांना तातडीने जुने बिटको रुग्णालयातील दीडशे कर्मचाऱ्यांपैकी शंभर कर्मचाऱ्यांची नेमणूक नविन बिटको रुग्णालयात करण्याचे निर्देश दिले.

त्यामुळे लवकरच नवीन बिटको रुग्णालयात दुप्पटीने म्हणजेच शंभर ऐवजी दोनशे कर्मचारी रुग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. त्यामुळे सध्यास्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार असून रुग्णांना देखील दिलासा मिळाला आहे. यावेळी नगरसेवक उत्तम कोठुळे, आर. डी. धोंगडे, राजूआण्णा लवटे, विशाल संगमनेरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com