कोविड सेंटर
कोविड सेंटर
नाशिक

दिंडोरी : क्वारंटाईन रूग्णांना माणुसकीचा आधार

पिंपरखेंड ग्रामस्थांचा उपक्रम

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझे : दिंडोरी तालुक्यात ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विलीगीकरण कक्ष उभारण्यात आले. तेथील काही गावकऱ्यांनी त्यास विरोध केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले, मात्र पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी येथील कोविड केअर सेंटर ला सर्वोतोपरी मदत करण्यासोबतच येथे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी गरम पाणी, चहाची सेवा देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

देशासह राज्यात करोनाचे संकट उभे ठाकले असून या साठी सर्वच शासकीय यंत्रणा उपाययोजना करीत आहे. तर अनेक ठिकाणी नागरिक रुग्णांची व क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींची हेळसांड करीत असल्याचा तक्रारी पहावयास मिळाल्या. दिंडोरी तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून या पार्श्वभूमीवर पिंपरखेड येथील आदीवासी विभागाची आश्रम शाळा संशयित व्यक्तीच्या विलगिकरण कक्ष व उपचारासाठीच्या कोविंड केअर सेंटर साठी वापर होत आहे. या ठिकाणी रुग्णांना शासनाकडून जेवण व नाश्ता मिळतो. पिण्याचे पाणी, गरम पाणी व चहा बिस्कीट ची गरज निर्माण झाली होती.

अशावेळी गावातील धनंजय शेतकरी युवा बचत गटाने चर्चा करून सकाळी आठ वाजता व दुपारी चार वाजता असे दोन वेळेस पिण्यासाठी गरम पाणी चहा व बिस्कीट उपलब्ध करून द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे आज सकाळी वरीलप्रमाणे फिजिकल डिस्टन्स पाळून, आरोग्य सेवकांच्या मदतीने अगदी योग्य असे नियोजन करून वाटप केले. यापुढे हा उवक्रम चालू ठेवणार असल्याचे बचतगटाचे अध्यक्ष कैलास पवार यांनी सांगितले. या उपक्रमासाठी उपाध्यक्ष विजय पवार, पिपरखेडचे उपसरपंच बबनराव पवार, सदस्य प्रशांत पवार, संदीप पवार, गणेश पवार, भगवान पवार, अरुण पवार, गोरख पवार, पोपट पवार निवृत्ती मोरे, संतोष शेटे, हर्षल गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले आहे.

करोना रुग्ण त्यांचे नातेवाईक संपर्कातील व्यक्तीबाबत समाजाने सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. दिंडोरी तालुक्यातील जनतेने करोना लढाईत प्रशासनाला खूप सहकार्य केले आहे. पिंपरखेड येथील ग्रामस्थ करत असलेली मदत कौतुकास्पद आहे.

- डॉ संदीप आहेर, प्रांताधिकारी दिंडोरी - पेठ

पिंपरखेड सेंटर मध्ये सर्व वैद्यकीय पथकातील सदस्य रुग्णांना आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यागत सेवा करत आम्हाला मानसिक बळ देत आहे. येथील डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी आमच्यासाठी देवदूत आहे.

- एक रुग्ण, कोव्हिड केअर सेंटर पिंपरखेड

Deshdoot
www.deshdoot.com