‘निमा पॉवर-2023’ प्रदर्शन बघण्यासाठी अलोट गर्दी

‘निमा पॉवर-2023’ प्रदर्शन बघण्यासाठी अलोट गर्दी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

'निमा पॉवर- 2023' प्रदर्शन म्हणजे राज्यातील इतर उद्योजकांसाठी आदर्शवत असेच आहे. निमाच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आणि प्रदर्शन केंद्र मंजूर झाले तसेच नाशकात मोठे प्रकल्प येत आहेत, ही आनंददायी बाब असल्याचे प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी संवाद माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने दोन दिवसांंत 50 हजारांहून अधिक लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

गेल्या दोन दिवसांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नागपूरचे आ. मोहन मोते, ज्येष्ठ उद्योजक व ई-स्मार्टचे संचालक सुरेश शाह, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, भाजपचे नाशिक मध्य मंडलाध्यक्ष देवदत्त जोशी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.

येत्या दोन दिवसांत गुंतवणुकीचे परस्पर सामंजस्याचे अनेक करार यावेळी होणार असून त्याद्वारे नाशिककरांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील, असा विश्वास निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर लोकांनी देशभरातून आलेल्या उद्योजकांच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक विषयक उत्पादने आणि नावीन्यपूर्ण कलाविष्काराचे कौतुक केले. नाशकातही मोठ्याप्रमाणात दर्जेदार उत्पादन होत असल्याचे पाहून अनेकजण अचंबित झाले. प्रदर्शनात शनिवारी सकाळी सीपीआरआयचे सहसंचालक एस. शामसुंदर, दुपारी डब्ल्यू.आर. सोलरचे संचालक वेदांत राठी, दुपारी ई-स्मार्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक आनंद राय, एचएएलचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन निमाचे पदाधिकारी शशांक मणेरीकर, श्रीकांत पाटील, राजेंद्र वडनेरे व राजेंद्र अहिरे यांनी केले.

प्रदर्शनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता उद्योजक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे प्रदर्शन पुढील दोन दिवस लोकांना बघण्यासाठी खुले असून लोकांच्या व गाळेधारकांच्या मागणीनुसार प्रदर्शनाची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांचे नावीन्यपूर्ण कलाविष्कार बघण्याची संधी दवडू नका, असे आवाहन प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी केले.

राज ठाकरे यांनी दिली भेट

यावेळी मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी प्रदर्शनाचे व निमाचे कौतुक केले. यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, नाशकात जर एवढे उत्पादने बनत असतील तर नाशिकमध्ये खूप मोठे पोटेन्शिअल असल्याने त्याला योग्य दिशा देऊन त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. मी आगामी नाशिक दौर्‍यावर आपल्याशी संपर्क साधतो. आपण आपल्या प्रमुख 10 ते 15 उद्योजक व पदाधिकार्‍यांसह एक बैठक घेऊन त्यात नाशिकच्या विकासाच्या बाबतीत माझ्या मनात असलेल्या संकल्पनाबाबत आपण चर्चा करू असे सांगितले. यावेळी निमाचे पदाधिकारी, उद्योजक व मोठ्या संख्येने जनसमुदाय तसेच स्टॉलधारक उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com