ही अनिश्चिता अजून किती दिवस?

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भावना..
ही अनिश्चिता अजून किती दिवस?

नाशिक । प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेचे काहीच निश्चित नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयीचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते. काय करावे तेच कळेनासे झाले आहे? अभ्यास तरी किती करायचा? या अनिश्चिततेमुळे वर्षभर जो अभ्यास केलाय तो देखील विसरायला होईल की काय असे वाटते आहे. ही अनिश्चितता अजून किती दिवस असेल? असे प्रश्न बारावीच्या विद्यार्थ्यांना पडले आहेत.

सामान्य परिस्थितीत आत्तापर्यंत बारावीच्या परीक्षा झाल्या असत्या. करोनाची साथ आहे हे मान्य आहे. पण ही परिस्थिती अजून काही काळ तरी अशीच असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मग आमच्या परीक्षा कशा होणार आहेत? जवळपास तेरा महिने होत आले आम्ही बारावीचा अभ्यास करतच आहोत. अजून किती दिवस करावा लागेल तेही कळत नाही. इतके दिवस ऑनलाईन अभ्यासाचा ताण होता.

नेट कनेक्टिव्हिटी मिळायची नाही. अनेकदा आवाज कमी जास्त व्हायचा. त्यामुळे सर काय शिकवायचे ते लवकर समजायचे नाही. या सगळ्या समस्यांशी झुंजून आम्ही अभ्यास केला. तर परीक्षांचे घोंगडे भिजत पडले आहे. त्या सारख्या पुढे ढकलल्या जात आहे. बारावीच्या गुणांवर पुढचे भवितव्य अवलंबून आहे. या सगळ्याचा खूप ताण आला आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

आता विसरायचीच भीती वाटते आहे!

मला ‘नीट’ची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी आधी बारावीची परीक्षा व्हायला हवी ना! ती कधी होणार तेच कळत नाही. जानेवारी 2020 पासून आम्ही बारावीचा अभ्यास सुरू केला आहे. तो अजून किती दिवस करावा लागेल? कोणालाच माहित नाही. तेव्हापासून जो ताण आला होता तो अजून वाढतच आहे. त्यामुळे खूप अस्वस्थता आहे. रिव्हिजन तरी किती वेळा करणार? काही गोष्टी विसरून त्याचीच भीती वाटते आहे. परीक्षेसंदर्भात एकदाचे काय ते निश्चित व्हावे.

रितिका तुषार कुलकर्णी

परीक्षा ऑनलाईन व्हावी!

करोना कधी संपेल माहीत नाही. गर्दी नको म्हणून अनेक निर्बंध आहेत. परीक्षा झाल्या तर सर्वाना एकत्र व्हावे लागेल. त्यामुळे सरकारने आमच्या परीक्षा ऑनलाईन घेऊन टाकाव्यात. गेले अनेक महिने आम्ही अभ्यास करतच आहोत. पण त्याला आमचा नाईलाज आहे. मला इंजिनिअरिंग करायचे आहे. ‘जेईई’ची तयारी ठेवावीच लागेल.

प्रणय सोनवणे

अभ्यास कोणत्या परीक्षेचा करायचा?

बहुतेकांना बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असतो. वेगवेगळ्या संस्थांच्या ड़िझाइनिंगच्या प्रवेश परीक्षा झाल्या आहेत. काही होत आहेत. बाकीच्या प्रवेश परीक्षा कधी होतील माहीत नाही. त्यामुळे बारावीचा अभ्यास करायचा की त्या प्रवेश परीक्षांचा? त्यामुळे पटकन काहीतरी निर्णय व्हावा, असे वाटते.

तन्मय जोशी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com