वादळी पावसाने घरांचे नुकसान

रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प
वादळी पावसाने घरांचे नुकसान

कंधाणे । वार्ताहर Kandhane

बागलाण तालुक्यातील कंधाणे व परिसरात काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृग नक्षत्रातील वरूण राजाने वादळीवार्‍यासह जोरदार हजेरी लावली. या वादळाच्या तडाख्यात तीन घरांवर वृक्ष उन्मळून पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबरोबरच कंधाणे-डांगसौदाणेरोड व पठावा रस्त्यावरही काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या भागातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. परिसरात तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत आपल्या आगमनाची चाहूल बळीराजांना दिली आहे.

अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्‍यांनी आपल्या शेतात साठवून ठेवलेल्या कांदा व गुरांच्या चारा झाकण्यासाठी बळीराजांची धावपळ उडाली होती. वादळामुळे कांदा साठवलेल्या चाळींवरील कागद उडाल्याने अनेक शेतकर्‍यांचा कांदा या पावसात भिजला आहे. कांदा भिजल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आधीच कांदा भावाचा घसरता आलेख त्यातच कांदा भिजल्याने कांद्याची प्रतवारी खराब होणार असल्याने हा भिजलेला कांदा मातीमोल भावात विकण्याची वेळ बळीराजावर येणार आहे. या वादळात विनायक बिरारी यांच्या राहत्या घराचे पत्रे उडाले असून घराशेजारील वृक्ष उन्मळून पडल्याने संभाजी बिरारी, समाधान बिरारी यांचे राहत्या घराचे नुकसान झाले आहे.

याबरोबरच माणिक बिरारी यांच्या घराशेजारील पत्र्यांच्या शेडवर लिंबाचे झाड पडल्याने शेडचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सटाणा-डांगसौदाणे रस्त्यावर कंधाणे परिसरात आंब्याचा वृक्ष उन्मळून पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मृग नक्षत्रातील वरूण राजा वेळेवर बरसल्याने बळीराजांच्या एका चेहर्‍यावर आनंद तर वादळी वार्‍याने केलेल्या शेतपिकांचे नुकसानीमुळे एका चेहर्‍यावर आसू पसरले आहे. नुकसानग्रस्त घराची पाहाणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

नामपूर परिसरात पावसाच्या सरी

काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास नामपूरसह परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा व पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.यंदा उन्हाची तीव्रता खूप होती. तप्त उन्हाने दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले होते. जून महिना सुरू होऊन दहा दिवस होऊन सुद्धा पाऊस पडत नसल्यामुळे सामान्य माणूस सुद्धा पावसाची वाट पाहत होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 जूनला पावसाच्या हलक्या भारी सरी पडल्यामुळे शेतकरी बांधवसुद्धा आनंदी झाला असून अजून पुढील काही दिवसात मान्सूनचा पाऊस झाल्यावर खरीप हंगामातील पेरणी सुरू होइल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतकर्‍यानी जमिनीत भरपूर ओलावा निर्माण झाला तरच पेरणी करावी, असे आवाहन बागलाण तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. नामपूर परिसरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून पेरणीसाठी मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम असल्याची अशी प्रतिक्रिया नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com