चोरीस मज्जाव केल्याने वॉचमनचा खून

क्राईम
क्राईम

मालेगाव | Malegoan

मनमाड चौफुली भागातील राजस्थान ढाब्यावर रात्री चोरीचा प्रयत्न करणार्‍या चौघा चोरट्यांना विरोध करणार्‍या वॉचमनचा चाकूचा भोसकून निर्घृण खून करण्यात आला.

तर एका ट्रकच्या क्लिनरला जखमी केले गेले. आज रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

कृष्णा चैत्राम सोनवणे (65, रा. चंदनपुरी शिवार) हे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राजस्थान ढाब्याच्या वॉचमनचे नाव आहे. रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास चौघा अज्ञात चोरट्यांनी ढाब्यात चोरीचा प्रयत्न केला.

मात्र सोनवणे यांनी तो धुडकावून लावत चोरट्यांना प्रतिकार केल्याने त्यांनी सोनवणेच्या अंगावर चाकूने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. तर सोनवणे यांना वाचविण्यासाठी आलेल्या एका क्लिनरला देखील मारहाण करत चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, किल्ला पो.नि. दिगंबर भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com