
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
नाशिकरोडला गुन्हेगारी, खूनी हल्ले, तोडफोड या घटना थांबण्याच्या नाव घेत नाही. जेलरोड येथील एका हॉटेल चालकावर चार जणांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्या हॉटेलच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे....
याप्रकरणी जखमी झालेले विपुल प्रकाश बागुल (रा. गोदावरी हाउसिंग सोसायटी, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा- बागूल यांचे जेलरोड देवमाता सदनसमोर लिफीव्हेज हॉटेल आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विपुल बागुल व त्यांचे सहकारी सुदीप महती आणि संजय गायकवाड जेवण करून शतपावली करत होते. यावेळी चार अनोळखी युवक आले.
हॉटेल मालक कोण आहे, अशी विचारणा करत बागूल यांना शिवीगाळ, मारहाण केली. उजव्या बाजूला कमरेच्या खाली पाठीमागून चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हॉटेलच्या काचा फोडून नुकसान केले. जखमी झालेले बागूल हॉटेलजवळ पडून होते. युवकांनी हॉटेलच्या काचा फोडून पळ काढल्यानंतर नोकरांनी जखमी बागूल यांना रुग्णालयात दाखल केले.
बागूल यांनी फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, वडील प्रकाश बागुल यांनी माझा मावसभाऊ निखिल लक्ष्मण मोरे (रा. भगूर देवी मंदिराजवळ) यांच्या नावावर बँकेतून कर्ज काढून आय टेन चार चाकी गाडी घेतली होती. मी गाडीच्या कर्जाचे हप्ते देखील फेडत होतो.
सहा महिन्यापूर्वी पहाटे निखिल मोरे काही न सांगता माझ्याजवळ असलेली आयटेन गाडी परस्पर घेऊन गेला. त्यानंतर गाडी विकून टाकली. मी निखिलकडे पैशाची मागणी केली. त्याने बँकेला पाच लाखाचा दिलेला चेक देखील बाउन्स झाला.
निखिलकडे वारंवार पैशाची मागणी केल्यावर तो उडवा उडवीची उत्तरे देत दमदाटी करू लागला. मी निखिलच्या दोन्ही बहिणींना सर्व प्रकार सांगितला. त्यातूनच हा हल्ला करण्यात आला असावा.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.