नव्या प्रभागरचनेमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित

नव्या प्रभागरचनेमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित

नाशिक । किशोर चौधरी Nashik

महाविकास आघाडीकडून ( Mahavikas Aaghadi )घोषित झालेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करीत नव्याने चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय शिंदे सरकारने ( Shinde - Fadnavis Govt )घेतला आहे. त्यामुळे इंदिरानगर व पाथर्डी भागातील पुरुष विद्यमान नगरसेवकांसह, इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या काळामधील प्रभाग क्रमांक 39 मध्ये आलेल्या आरक्षणामुळे विद्यमान पुरुष नगरसेवकांना दुसरीकडे प्रस्थापित व्हावे लागणार होते तर 44 मध्ये दोन महिला व एक अनुसूचित जमाती( पुरुष) जागेसाठी आरक्षण आले होते त्यातही ओबीसी आरक्षणानंतर घोषित करण्यात आलेल्या महिला आरक्षणाने सर्वच इच्छुक उमेदवार असलेल्या पुरुष मंडळींचा फुगा फुटला होता. त्यामुळे आलेल्या महिला आरक्षणाच्या जागेवर काहींनी आपल्या सौभाग्यवतींना उभे करण्याचा निर्णय घेतला होता.

आता ही 133 वरून 122 वर पालिकेतील सदस्य संख्या राहणार असल्याने नव्याने मतदार याद्या व आरक्षण सोडत काढावी लागणार असल्याने प्रभागातील गणिते बदलणार आहेत. त्याचा निश्चित फायदा विद्यमान नगरसेवकांसह पुरुष मंडळींना होणार असला तरी काहींना याचा फटका बसू शकतो.

इंदिरानगरमधील मागील प्रभाग क्रमांक 30 व पाथर्डी परिसरातील 31 भागात चार नगरसेवक होते. त्यात प्रभाग तीसमधून चारही भाजपचे तर पाथर्डी भागातून दोन शिवसेना व दोन भाजपला जागा मिळाल्या होत्या.

सध्या मागील सहा महिन्याच्या राजकीय हालचाली बघता इच्छुकांनी तयारी केलेल्या जागा काही महिलांच्या नशिबी आल्या होत्या. काही विद्यमान नगरसेवकांना प्रभागतूनच हद्दपार, दूर होण्याची वेळ आली होती. तर काहींनी आपल्या सौभाग्यवतींना संधी देण्याचा निर्णय घेतला होता.

मागील चार सदस्य भागाचा विचार करता जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्यास प्रभागातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेना हे पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. अद्यापही शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय निश्चित नसल्याने पुढील वेळेस शिवसेनेचे दोन गट तयार होतील का? हेही निश्चित होईल.

चार सदस्य असलेल्या प्रभागात भाजप व शिवसेना यांच्यात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकिटे न मिळाल्यास अपक्ष एकत्र येऊ शकतात. अपक्षांचा जोर कमी असला तरी ऐनवेळी निर्माण झालेली परिस्थिती बंडखोरीला चालना देऊन गट तयार करू शकतील का ? बंडखोरी जरी झाली तरी चार सदस्यीय प्रभागात त्यांचा टिकाव लागत नाही, हे मागील निवडणुकीतून हे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षीय तिकीट मिळवण्यासाठीच मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

मागील पंचवार्षिकमधील नगरसेवकांचा विचार केल्यास दोन ते अडीच वर्षे उद्भवलेल्या करोनाकाळामुळे कामे कमी झाल्याचे लक्षात येते, तर प्रभागातील जेवढ्या ही कामांवर विद्यमानांनी सांगितलेली दावेदारी पक्षाांना आवडते किंवा नाही, का नवीन चेहरे देऊन पक्ष नवीन इच्छुकांना संधी देते, हेही लक्षात येणार आहे.

नवीन घोषित होणार्‍या आरक्षणानुसार व प्रभागरचनेनुसार जैसे थे परिस्थिती आल्यास मागील प्रभाग क्रमांक 30, 31 मध्ये महिलांसाठी, अनुसूचित जाती, ओबीसी आरक्षण आल्यास पुन्हा एकदा इच्छुकांचा बीमोड होतो का, हे त्यावेळची परिस्थितीच ठरवणार आहे. प्रभाग आताच्या 44 मधून अनुसूचित जमातीसाठी सुटलेली जागा राहणार की जाणार, याविषयीही सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.

नव्याने निर्माण झालेल्या चार सदस्यीय प्रभागात इंदिरानगर, पाथर्डी भागातून विद्यमान नगरसेवकांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे. तीन सदस्यीय प्रभागातून ओबीसी आरक्षण दिल्यानंतर वाटेला न आलेल्या तिकिटासाठी आपल्या सौभाग्यवती यांचा विचार सुरू केला होता. परंतु पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

मागील पंचवार्षिकचा विचार केल्यास प्रभाग 31 मधून पुष्पा आव्हाड व संगीता जाधव यांना त्यांच्या रहिवाशी भागात प्रभाग रचना आल्यास फायद्याचे ठरते का तर 31 मधून सुदाम ढेमसे, भगवान दोंदे यांनाही आपल्या कामाचा व जनसंपर्काचा लाभ मिळतो की नाही हे हे दिसून येणार आहे.

मात्र चार सदस्यीय प्रभागातून सतीश सोनवणे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे यांनी काहीअंशी सुटकेचा निश्वास सोडला असेल यात शंका नाही. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक असलेल्याना पुन्हा एकदा प्रभाग रचना, आरक्षण सोडत प्रभागातून जोडीला येणारे सहकारी या बाबींचा विचार करीत आपली राजकीय जुळवाजुळव चालूच ठेवावी लागणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या मागील पंचवार्षिक मधील असलेले हे प्रभाग मोठे असल्याकारणाने नगरसेवकांची मोठ्याप्रमाणात धावाधाव व्हायची. त्यामुळे या प्रभागांमध्ये नेतृत्व करत असताना सर्वच ठिकाणी मतदार, रहिवाशांशी पूर्णपणे संपर्क होऊ शकलेला नव्हता. काही ठिकाणी तर आपल्या प्रभागाचे नगरसेवक कोण असेही प्रश्न उद्भवले गेले आहेत. त्यामुळे पुढील येणार्‍या चार सदस्यीय प्रभागात किमान आपला प्रभाग तरी आपणास पुरेशा माहिती असणे आवश्यक असण्याबरोबरच संपर्क ठेवणेही आवश्यक असल्याचे जाणवेल.

चार सदस्यीय प्रभागात मागील काळात नगरसेवकांनी आपापला भाग वाटून घेतल्याने सर्वच ठिकाणी त्यांना पोहचता आलेले नव्हते. त्यामुळे आता ही चारचा प्रभाग झाल्याने त्या भागातील सहकारी, दुसर्‍या उमेदवाराच्या भरोशावर पुढे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

रहिवाशांनी व मतदारांनीही मागील पंचवार्षिकमध्ये आपल्या नगरसेवकांचा कार्यकाळ जवळून पाहिला आहे. मतदार व रहिवासी या या पैकी काय निर्णय घेतील तो घेवो. आपला लोकप्रतिनिधी आपल्या जनसंपर्कात राहणारा, समस्या सोडवणारा असावा, केवळ पोपटपंची करणारा असू नये, पाच वर्षांमध्ये निवडणुका आल्यावरच जवळ येणारा नसावा, पैसे-पार्ट्या देऊन विकत घेणारा नसावा, असे अनेक प्रश्न प्रभागातील रहिवाशांकडून चर्चिले जाऊ लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com