बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे करोना योध्दांचा सन्मान

बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे करोना योध्दांचा सन्मान

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

दोन वर्षे करोना (corona) महामारीच्या कठीण व संकटमय काळात भिती व दहशतीमुळे रक्ताची नाती लांब राहत असतांना फक्त कर्तव्य व माणुसकीची भावना जपत बाधित रूग्णांवर औषधोपचारासह वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यासाठी

सक्रिय राहिलेल्या विविध क्षेत्रातील समाजसेवकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांच्या समाजसेवेचा उत्साह वाढावा या दृष्टीकोनातून बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे करोना योध्दांचा सन्मान (Honoring the Corona Warriors) व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांनी दिली.

बाजार समिती सभागृहात बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सोमवार दि. 16 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मसगा मैदानावर आयोजित करोना योध्दा सन्मान व नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाची माहिती मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव, अध्यक्ष कमलाकर पवार यांनी दिली. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून विनोदवीर डॉ. मिर्झा बेग यांचे समाजप्रबोधनात्मक मार्गदर्शन होणार असून सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी युवकनेते अव्दय हिरे हे राहणार आहे.

प्रथमच खासदार व केंद्रीय मंत्रीमंडळात आरोग्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कसमादे कन्या ना.डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्यासह पारनेरचे आ. नीलेश लंके, डॉ. सईद फरानी, सुनिल गायकवाड, डॉ. उज्वल कापडणीस, डॉ. पुष्कर इंगळे आदींसह विविध सेवा क्षेत्रातील अधिकारी, सेवकांचा करोना योध्दा सन्मान व नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती बच्छाव यांनी दिली.

करोना योध्दा (Corona Warrior) सन्मान सोहळा आयोजित करण्याचा उद्देश विषद करतांना बच्छाव पुढे म्हणाले, करोनाने घातलेल्या उद्रेकामुळे कुणाचे आई-वडिल, पत्नी, भाऊ व मुले दगावून कुटूंबाचा आधार गेल्याच्या दु:खदायक घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या भिती-दहशतीमुळे रक्ताची नाती बाधितांपासून लांब राहत असल्याचे चित्र दिसून येत होते. अशा संकट काळात जवळचे कुणी नसतांना कर्तव्य व माणुसकीची भावना जपत बाधीत रूग्णांना औषधोपचारासह वेगवेगळ्या सुविधा विविध क्षेत्रातील समाजसेवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता उपलब्ध करून दिल्या होत्या.

वैद्यकिय अधिकारी (Medical officer), सेवक, पाणीपुरवठा (Water supply), स्वच्छता सेवक (Sanitation worker), आशा सेविका (asha workers), गृहरक्षक दलाचे जवान, अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस, विनामुल्य अंत्यसंस्काराची सेवा देणारे सर्वधर्मीय कार्यकर्ते, ग्रामपंचायत सेवक आदी विविध क्षेत्रातील सेवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बाधित रूग्णांसह जनतेची सेवा केली आहे. बाधित रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा कमी पडत असतांना अनेक सामाजिक संस्थांसह आ. नीलेश लंके, सुनिल गायकवाड, डॉ. उज्वल कापडणीस, डॉ. पुष्कर इंगळे, डॉ. सईद फरानी यांच्यासारखे समाजसेवक पुढे सरसावले.

उपचार केंद्र निर्माण करण्यासह विविध सुविधा नागरीकांना या समाजसेवकांनी उपलब्ध करून देत हजारो बाधितांचे जीव वाचविले. बाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक पुढे येत नसतांना अनेक कार्यकर्त्यांनी मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले. अशा पडद्यामागील खर्‍या समाजसेवकांचा गौरव झाला पाहिजे. या दृष्टीकोनातून बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे करोना योध्दा सन्मान व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बारा बलुतेदार मंडळातर्फे यापुर्वी लष्करी जवान व सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली महापुरात शौर्य गाजविणार्‍या मेधने परिवारासह अजंग शिवारात तलावात बुडत असलेल्या मजुरांना वाचविणार्‍या निकिता सोनवणे या बालिकेचा शौर्य पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता समाजसेवेचा ध्यास बाळगणार्‍यांचा सन्मान करत त्यांचा उत्साह वाढावा, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीकोनातून आयोजित या सन्मान सोहळ्यास कसमादे भागातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी बंडुकाका बच्छाव, कमलाकर पवार यांनी केले.

Related Stories

No stories found.