कष्टकरी कुटुंबातील मुलींच्या पाठीवर थाप

शासकीय कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार
कष्टकरी कुटुंबातील मुलींच्या पाठीवर थाप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थीनींचे दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला.

अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.००टक्के गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील आहे. तर ८६.२०टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आरती ससाणे ही राजुर बहुला येथील असून शेतकरी कुटुंबातील आहे.

खो-खो खेळामध्ये राष्ट्रीय खेळाडू असलेली सुरगाणा येथील कौशल्या पवार हिने देखील ७९.८० टक्के गुण मिळविले आहेत. कष्टकरी कुटुंबातील या मुलींनी मिळवलेले यश इतरांना प्रेरणा देणारे असल्‍त्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विद्यार्थीनींचे कौतूक केले. कविता साठे यांनी विद्यार्थीनींचा परिचय करुन दिला.

यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ.वैशाली झनकर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सांळुके, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com