प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास समाजात सन्मान

व्यावसायिक सत्कार सोहळ्यात वेणुगोपाळ यांचे प्रतिपादन
प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास समाजात सन्मान

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

प्रामाणिकपणा (Honesty ) व सचोटीने केलेला व्यवसाय स्वत:च्या प्रगतीबरोबर समाजातदेखील सन्मान (Respect in society )मिळवून देणारा ठरत असतो. त्यामुळे प्रामाणिकपणा व सचोटीने व्यवसायात प्रगती साधणार्‍या व्यावसायिकांचा सन्मान करण्याची रोटरी क्लबची परंपरा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाळ यांनी येथे केले.

येथील रोटरी क्लब मालेगावतर्फे (Rotary Club Malegaon ) लोढा मार्केटमधील हॅप्पी हॉलमध्ये शहरातील उत्कृष्ट व्यावसायिक व रोटरी पालक सन्मान सोहळा नुकताच झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रांतपाल वेणुगोपाळ बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, जिल्हा सचिव राकेश डिडवाणीया, प्रकल्पप्रमुख विजय पोफळे, अध्यक्ष अ‍ॅड. विजय कुलकर्णी, डॉ. संजय बेंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील उत्कृष्ट व्यावसायिक व रोटरी पालक सन्मान करण्याची रोटरी क्लबतर्फे गत 23 वर्षांपासून जपल्या जात असलेल्या परंपरेचे प्रांतपाल वेणुगोपाळ यांनी कौतुक केले. प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करत प्रगती साधणारे व्यावसायिक खर्‍या अर्थाने ग्राहकांची सेवा करत असतात. अशा व्यावसायिकांमुळेच शहराच्या नावलौकिकातदेखील भर पडत असते. त्यामुळे सचोटीने व्यवसाय करणार्‍यांचा सन्मान करत त्यांचा उत्साह वाढवण्याचा रोटरी क्लबचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे वेणुगोपाळ यांनी सांगितले.

आजच्या नवीन पिढीला रोटरीच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचे आवाहन प्रांतपाल वेणुगोपाळ यांनी यावेळी केले. उत्साह व सकारात्मकपणा अंगी बाळगणारे युवक ध्येय साध्य करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधत असतात. ध्येयप्राप्तीसाठी त्यांच्याकडे खूप कल्पना आहेत. आजचे युवक काम न करण्याबाबत कारणे देत बसत नाहीत. त्यामुळे रोटरी क्लबमध्ये ध्येयप्राप्तीचा ध्यास असलेले नवयुवक सहभागी झाल्यास भविष्यकाळात रोटरी क्लबच्या नावलौकिकात निश्चितच भर पडेल व मोठ्या प्रमाणात समाज व लोकोपयोगी कार्य हाती घेता येतील. त्यामुळे नवीन पिढीचा समावेश रोटरीमध्ये व्हावा, अशी अपेक्षा वेणुगोपाळ यांनी व्यक्त केली.

यावेळी रोटरी पालक महेंद्र दोशी, कल्पना मोरे, मदनगोपाळ हेडा, सोमेश्वर काबरा, उत्कृष्ट महिला व्यावसायिक वंदना बाविस्कर, उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले, उद्योजक जियाउर्र रहेमान, नारायण सूर्यवंशी, उत्कृष्ट शेतकरी केवळ जाधव यांचा प्रांतपाल वेणुगोपाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. यावेळी दिलीप ठाकरे, मदनगोपाळ हेडा, वंदना बाविस्कर आदी सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास सतीश कलंत्री, प्रल्हाद शर्मा, रामनिवास सोनी, डॉ. जयंत पवार, चंद्रकांत शिरापुरे, महेश शर्मा, शिवनारायण काकाणी, दिलीप संन्याशिव, डॉ. दिलीप भावसार, उदय राहुडे, सचिन पवार, अनिता डिडवाणीया, संजय तुर्किया, मुकेश जनानी, अ‍ॅड. उदय कुलकर्णी आदींसह मोठ्या संख्येने रोटरी पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक विजय पोफळे यांनी तर सूत्रसंचालन शिवनारायण काकाणी, प्रशांत पाटील यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com