वीजदरवाढ प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार 'होळी'

वीजदरवाढ प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार 'होळी'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वीजदरवाढ (Electricity price hike) पूर्णपणे मागे घ्यावी या मागणीसाठी २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) या प्रस्तावाची होळी (holi) करण्याचा निर्धार निमा हाऊसमध्ये (Nima House) आयोजित वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे तर पमुख वक्ते म्हणून वीजतज्ञ प्रताप होगाडे उपस्थित होते. महावितरण (MSEDCL) कंपनीने ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी ३७% म्हणजे सरासरी प्रति युनिट २ रुपये ५५ पैसे दरवाढ मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे, यामुळे उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर निमा (NIMA), आयमा (AIMA) यांच्या संयुक्त विद्यमाने असयोजित या बैठकीत प्रस्तावित वीजदरवाढीला सर्वांनीच कडाडून विरोध करताना महावितरण, महाजनको आणि महापारेषचया कारभारावर जोरदार ताशेरे ओढन्यात आले. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मुकुंद माळी, सिद्धार्थ सोनी, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, ग्राहक संघटनेचे दत्ताजी शेळके, राजेंद्र अहिरे, निमाच्या उर्जा समिती चेअरमन रवींद्र झोपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित उद्योजकांनी आपल्या भाषणात सांगितले कि, महावितरणचे (MSEDCL) सध्याचेच वीजदर हे देशातील सर्वात जास्त दर आहेत. पुन्हा विज दरवाढ (Electricity price hike) झाल्यास राज्यात नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांना त्यामुळे आळा बसेल. राज्यात सध्या असलेले उद्योग अन्य राज्यात जाण्याची भीती यामुळे वाढणार आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना (farmers) अधिक संकटात टाकणारी आहे. राज्याच्या विकासावर त्याचा गंभीर परिणाम होईल हे लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत काय ती ठाम भूमिका घ्यावी. गांभीर्याने कठोर उपाययोजना करावी व राज्याच्या हिताच्यादृष्टीने ही संपूर्ण दरवाढ रद्द करावी.

इतकेच नव्हे तर सध्याचा असलेला वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर खाली आणावा असा सूर या बैठकीत उमटला. वीज दरवाढीच्या या प्रस्तावाला जास्तीत जास्त हरकती नोंदविता याव्यात यासाठी सुविधा केंद्र सुरू करावेत, हरकती नोंदवण्यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असल्याने आत्तापासूनच त्यासाठी पुढाकार घ्या.आतापर्यंत दाखल झालेल्या हरकती या फारच कमी आहेत.त्याचा वेग न वाढल्यास वीज दरवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल आणि नंतर आपण काहीच करू शकणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे असा इशारा प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात दिला.

प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले चर्चेत सिद्धार्थ सोनी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, लघुभरतीचे वामन भानोसे, सुरेंद्र मिश्रा, मुकुंद माळी,दत्ता शेळके, मिलिंद राजपूत आदींनी सहभाग नोंदविला. २८ तारखेला वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलनाच्या नियोजनासाठी आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी झाला. यावेळी आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब,सहसचिव योगिता आहेर कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे विलास देवळे यांच्यासह वीज ग्राहक आणि औद्योगिक समानव्यय संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com