विभागीय कार्यालयावर थकबाकीदारांच्या नावाचे होर्डींग्ज

थकित घर व पाणीपट्टीसाठी प्रशासनाचा निर्णय
विभागीय कार्यालयावर थकबाकीदारांच्या नावाचे होर्डींग्ज

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना साथीमुळे संपुर्ण देशाची अर्थिक घडी विस्कटलेली असुन याचा मोठा परिणाम नाशिक महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या-रोजगार गेल्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी भरली न गेल्यामुळे महापालिकेला मोठा फटका बसला आहे.

महापालिकेच्या करांच्या थकबाकीचे प्रमाण वाढले असुन त्याच्या परिणाम आता शहरातील विकास कामांवर पडला आहे. कराच्या वसुलीसाठी आता महापालिका प्रशासनाकडुन बड्या थकबाकीदारांच्या नावाचे होर्डीग्ज विभागीय कार्यालयाजवळ लावण्याचा व वृत्तपत्रातून थकबाकीदारांची नावे प्रसिध्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

राज्यात 24 मार्च पासुन लागु झालेले लॉकडाऊन तीन महिन्यानंतर काहीअंशी शिथील करण्यात आले होते. नंतर टप्प्या टप्प्याने काही निर्बंध हटविण्यात आले. मात्र औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात 25 टक्के उपस्थितीत कामे सुरू झाल्याने नागरिकांना मोठा अर्थिक फटका बसला.

आता काहीअंशी नागरिकांचे जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजी रोटी गेली असुन हातावर पोट असणार्‍या मजुर, शेतमजुर व बांधकामावरील कामगार यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी रुपाने जमा होणार्‍या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

पाणीपट्टीच्या माध्यमातून या विभागाला थकबाकी व चालु असे एकुण 108 कोटी रुपयांचे उद्दीेष्ट देण्यात आले होते. यातील थकबाकी आत्तापर्यत केवळ 9 टक्केच वसुल झाले असुन चालु वसुली ही 30 टक्के इतकीच वसुल झाल्याची अशी आकडेवारी नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात समोर आली होती. अशीच अवस्था घरपट्टीची असल्याचे समोर आले होते.

यामुळे घरपट्टी वसुलीत वाढ होण्यासाठी 1 नोव्हेंबरपासुन सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. घरपट्टी थकबाकीदारात 25 हजारापासुन 1 लाख रुपयांपर्यत थकबाकीदाराचा आकडा 13 हजार 189 इतका आहे. तसेच 1 लाखांच्यावर असलेल्या थकबाकीदारात बहुतांशी शासकिय कार्यालयाचा समावेश आहे.

अशाप्रकारे वाढत गेलेली थकबाकी वसुलीसाठी आता महापालिका प्रशासनाकडुन सहाही विभागीय कार्यालयासमोर मोठ्या थकबाकीदारांची नावे असलेले होर्डीग्ज लावण्यात येणार आहे.

तसेच या थकबाकीदारांच्या नावाची यादी वृत्तपत्रातून प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे थकबाकी वसुली होईल अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाची असुन ही अपेक्षा पुर्ण होणार का ? याचे उत्तर लवकर मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com