हिंदी भाषा लोकसंवादाचे सर्वोत्तम माध्यम

हिंदी भाषा लोकसंवादाचे सर्वोत्तम माध्यम

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

हिंदी सर्व भारतीय भाषांची मोठी बहीण आहे. ज्याला हिंदीतून अस्खलित भाषण करता येते, त्याला देशभर नेतृत्वाची संधी आजही उपलब्ध आहे. मात्र, दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यासारखे अस्खलित हिंदीतून प्रभावी भाषण करणारा नेता आजही महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. हे सर्वच राजकीय पक्षाचे नेते खुल्या दिलाने मान्यही करतात. मात्र, त्यातून धडा घेेऊन एकही नवा कार्यकर्ता पुढे येण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाही.

आज हिंदी दिन साजरा होत आहे, त्यानिमित्ताने सर्वत्र हिंदी दिनाचे महत्त्व विषद केले जात आहे. सर्वच जण हिंदी जाणतात. लिहितात, वाचतात, ऐकतात, गुणगुणतात. मात्र अस्खलित हिंदीतून बोलण्याची वेळ आली की बोबडी वळल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

विविध भाषांमधील उपयुक्त आणि लोकप्रिय शब्दांना एकत्रित करून भारताची खरी संपर्क भाषा बनण्याची भूमिका हिंदी बजावत आली आहे. हिंदी ही जनआंदोलनाची भाषाही आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा म्हणाले होते, भारतीय भाषा नद्या आहेत आणि हिंदी महानदी आहे. हिंदीचे हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक कंपन्या या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माहिती तंत्रज्ञानात हिंदीचा वापर वाढत आहे.

आज जागतिकीकरणाच्या युगात, हिंदी ही जागतिक स्तरावर प्रबळ भाषा म्हणून उदयास आली आहे. आज जगभरातील 175 हून अधिक विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकवली जात आहे. हिंदीत ज्ञान-विज्ञानाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर लिहिली जात आहेत. सोशल मीडिया आणि मीडियामध्ये हिंदीचा वापर सातत्याने वाढत आहे. हिंदीतून गाणे सर्वच गुणगुणत असतात. मात्र त्यावर प्रभुत्व फारसे दिसत नाही. प्रमोद महाजन, राजीव दीक्षित ज्या पद्धतीने हिंदीतून संवाद साधत तेवढा संवाद साधणारे नेते महाराष्ट्रात तरी दुर्मीळ झाले आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही हिंदीतून कामाला चालना मिळावी, जेणे करून देशाच्या प्रगतीत ग्रामीण जनतेसह सर्वांचा सहभाग सुनिश्चित करता येईल. त्यासाठी तांत्रिक ज्ञानाशी संबंधित साहित्याचे हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये सहज भाषांतर होणे आवश्यक आहे. यासाठी राजभाषा विभागाने साधी हिंदी शब्दसंग्रहही तयार केला आहे. राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मूलभूत पुस्तक लेखन योजनेद्वारे हिंदी भाषेतील ज्ञान-विज्ञान पुस्तकांच्या लेखनाला राजभाषा विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. हिंदी हे भारतातील लोकांमधील संवादाचे सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. हिंदी भाषेच्या प्रसारामुळे संपूर्ण देशात एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असे हिंदी भाषिकांना वाटते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com