ऐतिहासिक घटनांना उजाळा

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यात डोळ्यांचे पारणे फिटले
ऐतिहासिक घटनांना उजाळा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

जेलरोडची शिवराज्याभिषेक समिती व टीम ध्येयपूर्तीतर्फे जेलरोडच्या नारायणबापू चौकात चार दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जल्लोषात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी लेझर शो, शिवकालीन युध्द कला व मर्दानी खेळाने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवकालीन युध्दकला अभ्यासक रवींद्र जगदाळे यांचे शिवरायांच्या युध्दनितीवर व्याख्यान झाले.

शनिवारी (दि. 3) सायंकाळी साडेसातला छत्रपती शिवराय व आजचा युवक यावर इग्रायटेड माइंड्स फाउंडेशनचे संचालक गोपाळराव मोजाड यांचे व्याख्यान झाले. आज (दि.4) संभाजी व पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची छत्रपतींचा शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास या विषयावर आनंद क्षेमकल्याणी मुलाखत घेणार आहेत.

यावेळी संयोजक कैलास आढाव, राजाराम लोखंडे, नामदेव आढाव, सचिन हांडगे, विलास आढाव, दिलीप आढाव, कुलदीप आढाव, गणेश सातभाई, राहुल कोथमिरे, विजय लोखंडे, विनायक आढाव, प्रसाद आढाव, अ‍ॅड. शरद निवृत्ती आढाव, कल्पेश बोराडे, शरद आढाव, मयूर आढाव, राम आढाव, विशाल पगार, योगेश कपिले, ओंकार लभडे आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी पुणे येथील युवक युवतींनी हलगीच्या तालावर रामोशी कुर्‍हाडी, ढाल-तलवार, दांडपट्टा, भाला, चक्र, शूल, लाठी-काठी या खेळाची प्रात्यक्षिके दाखवून टाळ्या मिळवल्या. शिवकालीन युद्धकला अभ्यासक रवींद्र जगदाळे व्याख्यानात म्हणाले की, शिवरायांचा पराक्रम नव्या पिढीला माहित व्हावा म्हणून शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके दाखवत असतो. महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील युवकांनी हा इतिहास जाणून घ्यावा. यासाठी मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करावेत.

नाशिकच्या शंभू नाद पथकाने ढोल वादन आणि भगवे झेंडेधारी युवकांनी तालनृत्य सादर केले. विंचूर दळवीतील ज्ञानेश संगीत विद्यालय वारकरी शिक्षण संस्थेतर्फे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांनी उगवला तारा तिमिर हारा, गर्जा शिवाजी राजा, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, शिवरायांची तलवार, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती आदी पोवाडे सादर केले. ओमकार भुसारे, जयदेव भुसारे, बाळकृष्ण रिकामे, सोमनाथ भुसारे यांनी वाद्य साथसंगत केली.

आत्मा मालिक ज्ञानपीठातर्फे मयूर देशमुख यांनी नमो नमो ओंकार स्वरूपा, झाला महाराष्ट्राचा राजा, शिवबा राजा गं, आधी होता वाघ्या, दैव योग्य झाला पाग्या आदी भारूडे सादर केली. त्यांना योगेश पवार, अमेय ढालकरी, आकाश गवळी, ओमकार सोनवणे, रेश्मा देशमुख, पुष्पा देशमुख, कविता पिते यांनी गायनाची तर वैभव काळे, प्रसाद चव्हाण यांनी वाद्याची साथसंगत केली. तसेच इंदिरानगर व पाथर्डी परिसरात ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना, ठाकरे गट शिवसेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com