नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात (एप्रिल ते नोव्हेंबर 2020) कार, ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन, जीप इत्यादी 145 रॅक्समधून भारतातील विविध शहरांमध्ये वाहतूक केली आणि बांगलादेशला निर्यातसुद्धा केली आहे.

दि. 19 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातून 80 रॅक्स, पुणे विभागातून 53 रॅक्स, नागपूर विभागातून 9 रॅक्स व मुंबई विभागातून 3 रॅक्स मोटारींची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षात (2020-21) 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 145 रॅक्समध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. हा व्यवसाय वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्यालय व विभागीय स्तरावरील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे महासंचालक संजीव मित्तल यांनी कौतुक केले.

एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या आर्थिक वर्षात ऐतिहासिक पाऊल म्हणून मुंबई विभागातून प्रथमच 87 पिकअप व्हॅनने भरलेल्या 23 एनएमजी वॅगनचे रॅक कळंबोली ते बेनापोल, बांगलादेश येथे पाठविण्यात आले आणि त्यानंतर महिंद्राचे 83 पिकअप व्हॅनने भरलेले दुसरे रेक दि.20 नोव्हेंबर रोजी 25 एनएमजी वॅगन्समधून बेनापोल, बांगलादेश मध्ये पाठविण्यात आले. दि. 31.8.2020 रोजी नव्याने सुरु केलेल्या अजनी गुड शेडमधून फिरोजपूरमध्ये पाठविण्यासाठी ट्रॅक्टर लोड केले गेले.

बांगलादेशात ऑटोमोबाईल्सची निर्यात म्हणून, ट्रॅक्टरचा पहिला रॅक दि. 13.10.2020 ला अजनी गुड शेड येथून बांगलादेशच्या बेनापोलकरिता भरला गेला. ऑटोमोबाईलची (एनएमजी) एक रेक चिंचवड गुडशेडमधून एर्नाकुलम येथे 9 वर्षांनंतर लोड केली गेली. ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन आफ इंडियाने (टीसीआय) 75 पिकअप व्हॅन असलेली 25 एनएमजी रॅक मध्य रेल्वेच्या चिंचवड ते बेनापोल, बांगलादेश येथे प्रथमच लोडींग करून पाठविली आहे.

भुसावळ विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 80 रेक लोड केले आहेत. देशांतर्गत रेल्वे वाहतूक सेवा बरीच लोकप्रिय झाली आहे. मेसर्स महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड नाशिकने काळैकोंडा, चित्तपूर, रक्सौल या नवीन ठिकाणी लोडींग करून रवाना केली आहे.

भारतीय रेल्वेने घेतलेल्या सुलभ मालवाहतुकीसाठी अनेक उपाययोजना आणि मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिटच्या (बीडीयू) विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल लोडिंगची गती वाढली आहे. बीडीयूची सक्रिय भूमिका रेल्वेला नवीन व्यवसाय देणार्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. यामध्ये एनएमजी रॅक्सच्या फेर्यामधील वेळेवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन मालाच्या पुन्हा वाहतुकीस रेक उपलब्ध होईल. त्यायोगे नवीन संधी आकर्षित होतील.

लवकरच एनएमजी रॅकमध्ये ऑटोमोबाईल्स (महिंद्रा अँड महिंद्रा) जीप व ट्रॅक्टर कळंबोली (केएलएमजी) ते बांगलादेश येथे वाहतूक करण्यास दाखल होतील. मध्य रेल्वेने बुटीबोरी येथून एनएमजी लोडिंग वाढविणे, बारामती येथून ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करणे आणि ऑटोमोबाईल वाहतुकीचे लोडिंग/अनलोडिंग यासाठी लोणी विकसित करण्याची योजना आखली आहे. मध्य रेल्वेने सर्व प्रकारच्या मदतीसाठी वाहन कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या आणि लोडर्सचा विस्तार केला आहे आणि त्यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.