सुकेणेत उभं राहतंय हायटेक वाचनालय

सुकेणेत उभं राहतंय
हायटेक वाचनालय

कसबे सुकेणे | Kasbe Sukene

येथे अद्ययावत हायटेक वाचनालय उभारले जात असून त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

माजी आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणेकरांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळून येथील हायटेक वाचनालयासाठी ४४ लाख रुपये निधी मंजूर करून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. कसबे सुकेणे गावाला सद्यस्थितीला एकही वाचनालय नसून तालुक्यातील पाच नंबरचे मोठे गाव असूनही पूर्वीचे असलेले वाचनालय काळाच्या ओघात पडद्याआड गेले.

पर्यायाने ही बाब हेरून येथील जि.प. सदस्य दीपक शिरसाठ, कसबे सुकेणे ग्रामपालिका व ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार अनिल कदम यांच्या निदर्शनास ही बाब आणून वाचनालयाची मागणी केली होती. कालांतराने निवडणूका घडून आल्यानंतर आमदार अनिल कदम यांचा पराभव झाला.

मात्र दिलेल्या शब्दाला आपण जागतो या भावनेतून सदर वाचनालयाचा निधी मंजूर करून कसबे सुकेणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी भव्यदिव्य हायटेक वाचनालय उभे राहत आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच प्रकारचे पुस्तके उपलब्ध होणार असून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जागतिक ज्ञान मिळवण्यासही नागरिकांना मदत होणार आहे.

यावेळी माजी सरपंच छगन जाधव म्हणाले की, माजी आमदार कदम यांनी दिलेला शब्द पाळला असून भव्य-दिव्य वाचनालय उभे राहत आहे. भविष्यात वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढण्यास मदतच होणार आहे.

या वाचनालयामुळे परिसरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा पिढी यांच्यात वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल.

Related Stories

No stories found.