हेरिटेज वृक्षाच्या अज्ञातांनी छाटल्या फांद्या

हेरिटेज वृक्षाच्या अज्ञातांनी छाटल्या फांद्या

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

हेरिटेज वृक्षाचा दर्जा असलेल्या उंटवाडी म्हसोबा पूल येथे असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या अज्ञात व्यक्तींनी छाटल्याने सदरहू हेरिटेज वृक्षाच्या अस्तित्वाला धक्का पोहोचल्याने संबंधितांच्या चौकशीची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

दिव्या अ‍ॅडलॅब ते संभाजी चौक याठिकाणी उड्डाणपुलाच्या मंजुरी मिळाली होती. मात्र त्यासाठी उंटवाडी पुलाजवळ असलेल्या हेरिटेज वृक्षाच्या फांद्या छाटल्या जाणार होत्या म्हणून नाशकातील वृक्षप्रेमींनी सदरहू वटवृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली होती. याची दखल तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत सदरहू हेरिटेज वृक्षाला भेट देत त्याच्या फांद्या न छाटण्याचे अधिकार्‍यांना आदेशित करत पुलाचा मार्ग बदलायला सांगितले होते.

त्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारची सत्ता आल्यावर सदरहू पुलाच्या कामाला स्थगिती मिळाल्याने सदरहू प्रश्नच मिटला होता. सदरहू हेरिटेज वटवृक्षाखाली शेकडो वर्षांपासून श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबतच येथे श्री म्हसोबा महाराजांचे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. सदरहू हेरिटेज वृक्षाच्या फांद्यांची गेल्या काही दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्तींनी छाटणी केल्याने या वृक्षालाच धोका निर्माण झाला आहे.

सदरहू छाटणीची महापालिकेतर्फे कोणतीही परवानगी घेतली नसून याच्या फांद्या छाटण्यामागे नेमके कारण काय? असा सवाल वृक्षप्रेमींनी केला आहे. छाटलेल्या फांद्या नंदिनी नदीच्या तिरावरच टाकून देण्यात आल्या आहेत. तरी सदरहू प्रकारची महापालिकेच्या उद्यान विभागाने चौकशी करून फांद्या छाटणी करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com