स्मार्ट सिटीच्या नावाखाली पश्चिमी अनुकरण

जागतिक वारसा दिन विशेष : वारसा जतन करणे आपले कर्तव्य: कासार-पाटील
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पश्चिमी अनुकरण

नाशिक | भारत पगारे

आज विचार केला तर आपल्या वारसास्थळांची स्थिती भयानक आहे. स्मार्ट सिटी, विकास, बांधकाम साकारणे हे वारसास्थळाला धरुन नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अाज अक्षरश: पश्चिमी अनुकरण चालले आहे. यात वारसास्थळांची वाट लावली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवे, असे झाले नाहीतर आपला वारसा शिल्लक राहणार नाही, असे मत स्थापत्य अभियंता याेगेश कासार-पाटील यांनी वक्त केले.

आज जागतिक वारसा दिन. भारत देश म्हणजेच एक वारसा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतात पावलाेपावली वारसा पाहायला मिळताे. मात्र सध्याच्या काळात एेतिहासिक, पाैराणिक महत्त्व असलेल्या अशा शेकडाे वर्षांच्या वारसास्थळांना घरघर लागली आहे. देखभाल, ठेवण नसल्याने आणि आयुर्मयादा संपुष्टात आल्याने आज शेकडाे वारसास्थळे अखेरची घटका माेजताना दिसतात. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन जनजागृती, संवर्धन करुन आपला वारसा जिवंत ठेवणे काळाजी गरज आहे. नाहीतर येत्या काळात केवळ चित्रातूनच या स्थळांचा उल्लेख हाेताना दिसेल, असे कासार-पाटील यांनी सांगितले. त्यांनी हेरिटेज डे अर्थात जागतिक वारसा दिनानिमित्त विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

भारताला सर्वच बाबतीत वारसा लाभला आहे. ताे आपल्या पूर्वजांनी ठेवला आहे. त्याचे महत्त्व आज आपल्या लाेकांना राहिलेले नाही. मात्र, असे करुन चालणार नाही. हा वारसा आणि स्थळे जतन करायलाच हवे, आपल्या भारतानेच शेकडाे वर्षांपूर्वी काही पद्धती शाेधल्या, त्याही प्रचंड अभ्यास, नियाेजन, गुणवत्तेच्या आधारे. मात्र, त्याचे श्रेय पाश्चिमात्य देश घेताना दिसतात. सध्याची जी काही संकल्पचित्र, रचना आहे. ती जुन्या काळात भारतात वापरली गेली आहे. मातीच्या कामांना विराेध हाेत असला तरी आजही पूर्वीची ही कामे अबाधित आहेत. वारसा चांगला का वाईट याकडे आपण पाहिले पाहिजे. एकंदरीत आपला वारसा हा उन्नतच आहे. ब्रिटीश आले नसते, तर आपली प्रगती झाली नसती असे बिलकुल नाही. उलटपक्षी आपण तेव्हाच प्रगत हाेताे. आपल्याकडे त्याकाळी प्रत्येक बाबीला म्हणजे मंदिर बांधायचे असाे किंवा वाडा. तेव्हाचे लाेक उत्कृष्ट डिझायनर, अभियंते, तंत्रज्ञ हाेते. काहीतरी करायचे, बांधायचे असे तेव्हा हाेत नसे. एखादी बाब उभारायची म्हटल्यावर तेव्हा अचूक माेजमाप, तांत्रिक मुद्दे, बारीक दृष्टीकाेन, अभियांत्रिकी असा सर्वकष अभ्यास करुन उभारणी केली जात हाेती. नुसताच कल्पनाविलास नाही तर, काहीतरी कारण, आधार, भाैगाेलिक स्थिरता वैगेरे बाबींचा विचार केला जात. आज आपण पर्यावरणपूरक म्हणचेच इन्व्हायर्नमेंट फ्रेंडली, ग्रीन बिल्डिंग म्हणताे, मात्र त्याकाळातील जुने बांधकाम बघितले तर, तेथे आपल्याला उन्हाळ्यात गारवा मिळेल. थंडीत गेले तर, उब मिळेल, जुन्या बांधकामात पावसाचे पाणी शिरणार नाही, अशी जडणघडण, व्यवस्था केली जायची. सध्या रेनवाॅटर हार्वेस्टींगचा उदाेउदाे पाहायला मिळताे. मात्र, रेनवाॅटर हार्वेस्टींग हे प्रथम आपल्या किल्ल्यांवर झालेले पाहायला मिळेल. किल्ल्याच्या एका टाकीतून पावसाचे पाणी दुसऱ्या टाकीत, त्यानंतर तिसऱ्या टाकीत वळवले जात. ग्रीन बिल्डिंग, रेनवाॅटर हार्वेस्टींग हे कार्य भारतात घडले आहे. वरील इंग्रजी शब्द हे पश्चिमेकडून आलेले व आपण नाहक आयात केले आहेत. आपलेच तंत्रज्ञान परदेशी लाेकांनी नेले आणि तिकडून ते आपल्याला उपदेशाचे डाेस पाजत आहेत. नाशिकमध्ये २० वर्षांपूर्वी २० हून आधिक जुने वाडे हाेते. नाशिक महानगरपालिकेने हेरिटेज समितीच्या माध्यमातून अधाेरेखितही केले हाेते. मात्र प्रशासकीय उदासिनता असल्याने आज यातील एकही वाडा शिल्लक नाही. ही फार दुर्दवी बाब आहे. आजही नाशिकमध्ये चांगले वाडे आहेत. त्यांचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे. आपल्याकडे अलीकडेच स्मार्ट सिटीची कामे हाेत आहेत. मात्र हे कामे करताना वारसास्थळांची माेडताेड करुन सिमेंटची कामे केली जात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अंदाधुंद काम सुरु आहे. काहीही नवीन बांधकाम म्हणजे रस्ते, जुन्या वास्तू बांधताना त्याचे आयुर्मान किती आहे, हे न पाहता त्याची ताेडफाेड केली जाते व नवे बांधकाम केले जात आहे.

काँक्रीटीकरण, फरशीकरण यालाच जर आपण वारसास्थळांचा विकास म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. पंचवटीतील सरस्वती नदी. तिच्याखाली जुना नाला आहे, हे स्मार्ट सिटीच्या आधिकाऱ्यांना माहित नव्हते. अशी जर बिकट अवस्था, असेल तर नाशिकचे नियाेजन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची, हे खरे सत्य आहे. सरकारवाड्यामध्ये वर्षानुवर्ष पाण्याचा निचरा हाेत हाेता. आता मात्र बांधकाम झाल्यानंतर दाेन वर्षांपासून तेथे पाण्याचा याेग्य निचरा हाेत नाही. पाणी साचून राहते. सुदैव एवढेच की, पाणी धाेक्याच्या पातळीपर्यंत जात नाही. दरम्यान, आम्ही एकदा सेमिनार आयाेजित केला हाेता. तेव्हा बहुतेक नाशिकककरांना ‘सरकारवाडा’ ही वास्तू माहित नव्हती. अद्याप अनेकांना सरकारवाडा काय आहे, कुठे आहे, हेच माहित नाही. सरकारवाडा पाेलीस ठाणे ? अशी विचारणा केली गेली. हे दुर्देव आहे.

हेरिटेज कमिटी तयार करावी

यूडीपीसीआरच्या निर्णयाप्रमाणे लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेने हेरिटेज कमिटी तयार करावी. या माध्यमातून याेग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. खासगी वारसास्थळांना प्राेत्साहन देण्याचे अधिकार या कमिटीला आहेत.त्यात विकास निधीतील २ टक्के राखीव ठेवावे अशी तरतूद आहे. ती याेग्य प्रकारे वापरली जावी. वारसास्थळांसाठी याेग्य प्रकारे वापर केला पाहिजे.

इंटॅक कटीबद्ध

वारसास्थळांचे जतन, माहिती संकलन, जनजागृती करण्यासाठी भारतीय पातळीवर इंटॅक (आयएनटीएसीएच) ही संघटना कार्यरत आहे. नाशिकला त्यांचे युनिट आहे. तसेच संशाेधन मंडळ ही कार्यरत हाेते. मात्र, वर्षभराच्या कराेनामुळे त्यांचे काम लांबणीवर पडले आहे. या संस्थांमार्फत सेमिनार, माहितीचे कार्य, हेरिटेज वीक सुरु असायचे. जनजागृती सुरुच आहे, इंटॅक लहानग्यांसाठी चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयाेजन करते. लहान मुलांवर हेरिटेज हा विषय बिंबवायला हवा.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com