भविष्य निर्वाह निधी, पगार खर्चून करोनाग्रस्तांना मदत

भविष्य निर्वाह निधी, पगार खर्चून करोनाग्रस्तांना मदत
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी

समोरच्या ताट द्यावे, पण आपला पाट देऊ नये, असा नटसम्राटमधील डायलॉग आहे. उपनगर येथील गौतम पगारेंनी ताटही दिला आणि पाटही. प्रॉव्हिडंट फंड, पगारावर संसार चालतो. लॉकडाऊन काळात जीव धोक्यात घालून व पगार खर्चून, वेळोवेळी फंड काढून पगारेंनी गावी जाणारे परप्रांतीय, गरीबांना मदत केली.

जेवण दिले, जीवनाश्यक वस्तू, औषधे, किराणा वाटप केले. अकरा हजार मास्क स्वखर्चाने तयार करुन वाटले. करोनाच्या या दुसर्‍या लाटेत ते आठ सहकार्‍यांसह जिल्हा व शहरात करोना रुग्णांचे निवासस्थान, इमारती स्वखर्चाने सॅनिटायझेशन करत असून रुग्णांना रुग्णालयात दाखल करत आहेत. नागरिकांचे टेंपरेचर घेऊन समुपदेशन करत आहेत.

उपनगरला राहणारे गौतम पगारे हे महापालिकेत 35 वर्षे स्वच्छता मुकादम होते. दोन महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले. आपला निम्मा पगार ते पहिल्यापासून समाजसेवेवर खर्च केला. ही रक्कम कमी पडते म्हणून प्रॉव्हिडंट फंड काढून समाजसेवा केली. अशाही परिस्थितीत एका मुलाला इंजिनिअर केले. दुसरा अकरावीत आहे. पगारे यांनी 1982 साली विश्वास ठाकूर, हिरामण तेजाळे आदींच्या बरोबर पंजाब शांती दौरा केला होता.

पगारेंनी करोनायोद्धा सोशल फाऊन्डेशन स्थापन केले असून वर्षभरापासून स्वखर्चाने उपक्रम राबवत आहेत. पगारे आर्मीतील सदस्यही साधे आहेत. रिक्षाचालक राजेश जाधव, फळविक्रेता गणेश म्हैसधुणे, वेल्डिंगवाला राजू शिंदे, ठेकेदार राजू गुरव, दुकानीतील कामगार रामा वाकोडकर, व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी, प्रेस कामगार गुरुराज कुलकर्णी, निवृत्त बँक कर्मचारी अशोक साळवे हे पगारेंनी हाक देताच रात्रीही धावून येतात.

हा ग्रुप अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, देहदहानाचा अर्ज भरुन घेणे, लष्कर भरतीसाठी येणार्‍यांना जेवण-नाश्ता देणे, महाशिवरात्रीला खिचडीवाटप. शिवजयंती, आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेणे आदींचा त्यात समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com