टाकळी रोडवर अवजड वाहतूक सुरूच

सर्वपक्षीय आंदोलनाची शून्य दखल, आश्वासनांचा फार्स
टाकळी रोडवर अवजड वाहतूक सुरूच

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

अवजड वाहतूक वळवण्यासाठी प्रभाग 16 ( Nashik NMC Ward No 16 )मधील सर्वपक्षीय आजीमाजी लोकसेवकांनी आंदोलन केले, निवेदनबाजी करून पहिली मात्र स्थानिक प्रशासन जागचे हलायला तयार नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका आगरटाकळी रोड येथील नागरिकांना विनाकारण सहन करावा लागतोय. या मार्गावर अपघात होऊन मृत्यूची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन शिस्त लागावी, रस्ता सुटसुटीत व्हावा, यासाठी पुणे, अहमदनगर, संगमनेर वरून येणारे मालवाहू ट्रक, डंपर, ट्रक्स व इतर माल भरून येणारी अवजड वाहने फेम सिग्नलहून वळवून आगरटाकळी मार्गे औरंगाबाद महामार्ग येथे मार्गस्थ करण्यात आली. द्वारका चौकातील वाहतुकीचा भार काही प्रमाणात तरी कमी झाला. परंतु अवजड वाहनांचा त्रास टाकळीरोडवर वाढला. टाकळीरोड, ड्रीमसिटी चौक येथे दुतर्फा नागरी वसाहती आहेत.

परिणामी हा रस्ता दिवसभर स्थानिक नागरिकांनी गजबजलेला असतो. त्यात अवजड वाहने या रस्त्यावरून वळवल्याने साहजिकच अपघातात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ड्रीम सिटी चौकात रस्त्यावर अवजड वाहनांखाली येऊन एका निष्पाप वयोवृध्द महिलेचा बळी गेल्याची घटना घडली. परिणामी टाकळी रोड व आसपासच्या परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटून नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. त्यावेळी सर्व आजीमाजी लोकसेवक, नगरसेवकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदने दिले.

एक दिवस लाक्षणिक उपोषणही केले. प्रशासनाच्या नाकर्तेपणावर रोष निर्माण होऊन घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची कशीबशी समजूत काढली. तातडीने या नागरी रस्त्यावरून अवजड वाहतूक वळवण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अजूनही अवजड वाहतूक येथून सर्रास सुरूच असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.

अवजड वाहतूकीमुळे परिसरातील वाहनधारक, पायी चालणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. लहानमोठे अपघात नित्यचेच झाले आहेत. अजून किती निष्पाप लोकांना प्राणास मुकावे लागल्यानंतर रस्ता मोकळा होईल, याचे उत्तर स्थानिक प्रशासनाने द्यावे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

निवेदनाच्या नशिबी केराची टोपली

रस्ता अपघाताचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन परिसरातील राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी लोकशाही, वैध मार्गाने निवेदने दिले, पोलीस परवानगीने एक दिवस लाक्षणिक उपोषणही केले, मात्र प्रश्न सुटू शकलेला नाही. प्रशासनाची हात झटकण्याची आणि केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याची वृती कायम असल्याचे दिसून येते. या प्रश्नी परिसरातील माजी लोकप्रतिनिधींनी तातडीने पाठपुरावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com