अतिवृष्टीने पिके सडली; रस्त्यांची वाताहत

सरसकट पंचनामे करण्याची शेतकर्‍यांची मागणी
अतिवृष्टीने पिके सडली; रस्त्यांची वाताहत

खेडलेझुंगे । वार्ताहर | Khedlezunge

तालुक्याच्या पूर्व भागातील खेडलेझुंगे (Khedlezunge), कोळगाव, कानळद, सारोळे थडी, धारणगाव वीर, नैताळे, धारणगाव खडक, रुई, धानोरे, देवगाव, करंजी, ब्राह्मणवाडे, वाकद शिरवाडे, दिंडोरी, नांदूरमध्यमेश्वर,

शिवरे, नांदगाव, डोंगरगाव परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी, नाले, ओढ्यांना महापूर आला असून, पुराच्या पाण्यात अनेक पूल वाहून गेले आहे. अद्यापही पाऊस उघडण्याचे नाव घेत नसल्यामुळे पुढील रब्बी हंगामाच्या (rabbi season) आशा देखील धूसर झाल्या आहेत.

परिसरात सततच्या पावसामुळे (monsoon) काढणीला आलेल्या सोयाबीन (soybean), मका (Maize), कांदे (onion), नव्याने टाकलेली कांद्याची रोपे, भाजीपाला (vegetables), टोमॅटो (tomato) आदी पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ही पिके सडली आहेत. शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी जागा नसल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस करून खते, औषधे फवारणी करून व मशागत करीत ही पिके वाढविली होती. मात्र, आता ही सर्व पीके नेस्तानाबूत झाली आहेत.

या पावसात खेडलेझुंगे, देवगांव, कोळगांव, रुई, कानळद, सारोळे, नांदूरमध्यमेश्वर, शिवरे परिसरातील विजवितरण कंपनीचे पोल देखील आडवे झाले आहेत. तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांंना बसला आहे. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा (vineyard) उभ्या राहणार आहे.

गेल्या काही वर्षापासून परिसरातील शेतकरी टोमॅटो, भाजीपाला पिकाकडे वळले आहे. मात्र यावर्षी अतिवृष्टीच्या (heavy rain) तडाख्यात टोमॅटोची झाडे आडवी पडली तर भाजी काढण्यापूर्वीच शेतात सडली. शेतकर्‍यांनी महागडे कांदा बियाणे खरेदी करून टाकले होते. परंतु पावसाच्या पाण्यामुळे कांदा रोपे तयार होण्यापूर्वीच बी शेेतातच सडले. एकूणच अतिवृष्टीने सर्वच पिकांची वाट लावली आहे तर रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.

अनेक पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेले. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते त्यांचे तर आता खरे रूपडे उघडे झाले आहे. संपूर्ण शिवारच जलमय झाला असून, हातात आलेली पीके वाया गेल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड बनले आहे. त्यामुळे शासनाने सर्वच पिकांचे सरसकट पंंचनामे करावे अशी मागणी परिसरातील शेेतकरी करीत आहेत.

लोणगंगा नदीचा पूल गेला वाहून

विंचुर, थेटाळे, ठोकळवाडी परिसरामध्ये पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे लोणगंगा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. त्यामुळे तेथून होणारी वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे हाल बघावयास मिळाले. लोणगंगा नदीवरील अर्ध्याच्यावर पूल वाहून गेल्याने परिसरातील शेेतकर्‍यांना शेतमाल बाजारपेठेत पोहचविण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम तत्काळ करावे अशी मागणी संतोष गलांडे, शाम दरेकर, प्रभाकर गलांडे, अरुण दरेकर, रमन शेलार, नाना दरेकर, शरद गलांडे, रवींद्र दरेकर, विकी शिंदे यांचेसह विंचूर, थेटाळे परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतीला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले असून, शेेतातील पिके सडली आहे. तर अति पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास देखील खडतर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने जास्त अंत न पाहता शेतकर्‍यांना सरसगट मदत जाहीर करावी.

- योगेश साबळे, शेतकरी (खेडलेझुंगे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com