अतिपावसाचा खरिप हंगामाला फटका

अतिपावसाचा खरिप हंगामाला फटका

देवगाव । वार्ताहर Devgaon

देवगाव (Devgaon) व परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील आठवड्यात देवगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी (Farmers) अद्याप सावरला नसतांना गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन (Soybeans), कांदे (Onion), कांदा रोप, टोमॅटो (Tomato), भाजीपाला यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे होत्याचे नव्हते करून टाकले. या पावसामुळे शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहे.

देवगाव, धानोरे, धारणगाव या गावांना रहदारी व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्यावर देवगाव गावालगत असलेल्या नाल्याला नाला नंबर 16 नांदगाव, भरवस, वाहेगाव, महादेवनगर, डोंगरगाव, धानोरे या गावातून येणार्‍या पावसाचे व पुराचे पाणी बसत नसल्याने या नाल्याचे पाणी घरात शिरून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले.

अवघा शिवार जलमय झाल्याने हातात आलेली पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. वाड्या वस्त्यांचा अद्यापही गावांशी संपर्क होऊ शकलेला नाही. देवगाव परिसरात सलग चार दिवसांपासून पावसाचे तांडव सुरू आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची अक्षरश: वाताहात झाली.

त्यामुळे शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच देवगाव गावालगत असलेल्या नाला नंबर 16 वर पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी देवगावचे ग्रामपालिकेचे उपसरपंच लहानु मेमाने यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्याकडे केली आहे.

Related Stories

No stories found.