मालेगाव, बागलाण तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा

शेतकरी हवालदिल
मालेगाव, बागलाण तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा

मालेगाव । प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात वादळासह झालेल्या मुसळधार बेमोसमी पर्जन्यवृष्टीने अक्षरश: धुमाकुळ घातला. घरांसह कांदा चाळींचे पत्रे उडून भिंती कोसळल्या तर डेरेदार वृक्षांसह पपई, डाळींब बागा अक्षरश: जमीनदोस्त झाल्या.

चाळीचे पत्रे उडाल्याने कांद्यासह शेतमालाचे पावसाने अतोनात नुकसान झाले. अनेक गावात वादळामुळे वृक्ष वीजतारांवर उन्मळून पडल्याने पथदीप आडवे होवून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. या वादळाने हानी झाल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थ अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या सुचनेनुसार आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी तहसीलदार चंद्रजित राजपूत, कृउबा उपसभापती सुनिल देवरे, माजी जि.प. सदस्य सुरेश पवार, शिवसेना शहरप्रमुख श्रीरामा मिस्तरी, सरपंच सुनिल पवार, उपसरपंच अनिल पवार, रमेश अहिरे, शशिकांत निकम यांच्यासह कृषी अधिकारी आदींनी करत आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा दिला. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना यंत्रणेस देण्यात आल्या असून आपद्ग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनास अहवाल पाठविणार असल्याचे आश्वासन तहसीलदार राजपूत यांनी दिले.

शहरासह तालुक्यातील पिंपळगाव दा., जळगाव (गा.), रावळगाव, ढवळीविहिर, नितीनकर वस्ती, पवारवाडी, दळवी वस्ती, रिटायरवाडी आदीसह परिसरात दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार बेमोसमी पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातल्याने शेतात पाण्याचे तळे साचले. डाळींब, पपईच्या बागा अक्षरश: वादळी तडाख्याने जमीनदोस्त झाल्या.

दळवी वस्ती भागात गोरगरीब आदिवासी बांधवांचे घरांची पडझड होवून पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले तर रमेश रतन अहिरे यांच्या चार एकर क्षेत्रातील आंब्याची बाग जमीनदोस्त होवून लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले. पोपट पवार यांच्या 20 शेळ्या वादळी तडाख्याने मृत्यूमुखी पडल्या तर सुरेश हिरे, बापू पवार, दिलीप पवार, सुरेश पवार, गणेश पवार आदींसह अनेक शेतकर्‍यांच्या शेतमालाची अतोनात हानी झाली. अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे उन्मळून पडल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

शेताचे बांध फुटून पाणी वाहत होते तर अनेक ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी होते. काही ठिकाणी कांदा चाळीचे ही पत्रे उडून गेल्याने कांदा पावसात भिजला असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जळगावलगत जितेंद्र अहिरे व घनशाम अहिरे या शेतकर्‍यांच्या डाळींब बागा जमीनदोस्त झाल्या तर काशिनाथ संसारे, हिरालाल गेंद, सिताराम गंड यांच्या डाळींब व पपईच्या बागा तसेच कांद्याची चाळ वादळी पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त होवून लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले.

बागलाण मध्ये भाजीपाल्याचे नुकसान

सटाणा शहरासह तालुक्यात दोन दिवस वादळी वार्‍यासह बेमोसमी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

वादळामुळे रावळगाव फाट्याजवळ असणार्‍या कांदा व्यापारी श्रीधर कोठावदे यांचे कांद्याचे शेड पुर्णपणे भुईसपाट झाल्याने शेडमधील हजारो क्विंटल कांदा पाण्यात भिजला. शेडलगत असलेली बाळासाहेब बच्छाव यांची चहा व किराणा टपरी शेडखाली दबली गेली. सटाणा बाजार समितीत गोकुळ शिरोडे यांचे कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा ओला झाला. वादळी वारा आणि मुसळधार पावसात तालुक्यात अनेक ठिकाणच्या घरांवर व रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली. अनेक घरांचे पत्रे उडाल्यामुळे शेतकर्‍यांचा संसार उघड्यावर पडला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. तर काही ठिकाणी उंच झाडे वीज तारांवर कोसळून विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

दुपारी तीनच्या सुमारास अचानकपणे वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. सटाणा शहर, मोरेनगर, महाविद्यालय परिसर, सावकी फाटा, ठेंगोडा, लोहोणेर, जुनी शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंतनगर, औंदाणे, तरसाळी, मुंजवाड, खमताणे, चौंधाणे, कंधाणे, जोरण, किकवारी, कर्‍हे, कौतिकपाडे, वायगाव, सुराणे, देवळाणे आदी गावात पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आ. दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तलाठी व ग्रामसेवक यांना सुचना करून तात्काळ पंचनामे करण्याचे सांगितले .

या पावसामुळे मे महिन्यात लागवड झालेल्या कोबी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गवार, भेंडी, वांगे, वाल, शेवगा व इतर भाजीपाला तसेच पशुधनाचा चारा पिकांना जोरदार फटका बसल्याचे चित्र आहे. तसेच जोरदार वादळामुळे डाळींबाची झाडे वाकून शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

शेतांना तळ्याचे स्वरूप

लोहोणेरसह परिसरातील गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजेनंतर जोरदार वादळवार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने लोहोणेर-ठेंगोडा परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली तर विद्युत पोल जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. काही घरांसह शेडचे पत्रेही उडाले. या वादळीवार्‍याने बळीराजा मात्र चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.

लोहोणेर, ठेंगोडा, सावकी, विठेवाडी परिसरात वादळीवार्‍यासह जोरदारपणे पावसाने हजेरी लावली. आंब्याच्या झाडाखाली कैर्‍यांचा व पिकलेल्या आंब्याचा अक्षरशः सडा पडला होता. यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुकत्याच लागण झालेल्या टमाटे पिकांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी कांद्याची वरळी टाकून साठवणूक केली होती. सदरचा कांदा पावसात सापडल्याने यातील काही कांदा पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

वादळासह आलेल्या बेमोसमी मुसळधार पावसाने पिंपळगावसह जळगाव, रावळगाव, पवारवाडी, निताणकर वस्ती आदी पंचक्रोशीत अक्षरश: धुमाकुळ घालत डाळींब, पपई व आंब्याच्या बागांसह शेतमालांची अतोनात हानी केली आहे. गोरगरीबांच्या झापांचे व घरांचे पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. सुमारे तीन ते चार कोटी रूपयांची हानी या वादळाने झाली असून शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने त्वरीत पंचनामा करत नुकसान भरपाई देत आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा दिला पाहिजे.

सुरेश पवार माजी जि.प. सदस्य

Related Stories

No stories found.