
मनमाड । प्रतिनिधी | Manmad
पावसाळा (rainy season) सुरु होऊन तब्बल 13 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर आज (दि. 22) शहर परिसरासह ग्रामीण भागात (rural area) पावसाचे दमदार आगमन झाले. मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला.
त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवनदान मिळणार असून शेतकर्यांवरील (farmers) दुबार पेरणीचे (double sowing) संकट तूर्त टळले आहे. तथापि खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नसून त्यासाठी सलग आणि जोरदार पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे.
पावसाळा (monsoon) सुरु होण्याअगोदर शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. दि. 9 जूनरोजी तर चक्रीवादळ व मुसळधार पावसाने (heavy rain) हाहाकार माजविला होता. त्यावेळी वादळी वार्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले होते, सुमारे 10 कांदाशेड आणि चाळी जमीनदोस्त झाल्या होत्या.
मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहून पुढेही सलग पाऊस होईल, या आशेवर सुमारे 4 टक्के शेतकर्यांनी पेरणी केली होती तर उर्वरित 96 टक्के शेतकरी (farmers) सलग आणि दमदार पावसाची वाट पाहत होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता. दररोज आकाशात काळे ढग दाटून यायचे मात्र पाऊस पडत नव्हता.
पावसाअभावी पेरणी केलेली पिके करपू लागली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर आले होते. अखेर 13 दिवसानंतर आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. त्यांनतर मात्र चांगला पाऊस झाला. या पावसामुळे मान टाकलेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ज्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्या शेतकर्यांना पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला तर पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.