सिन्नर | Sinner
गुरुवारी (दि.२३) सायंकाळपासून सिन्नर तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पिकांना पाण्याचा ताण पडू लागला होता. गुरुवारी दुपारनंतर तालुक्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. जोरदार बरसणाऱ्या वरुणराजाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
आज (दि. २४)सकाळी सिन्नर तहसील कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वावी मंडळात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वावी परिसरातील गावांमध्ये माहिती घेतली असता रात्रभर पडलेल्या पावसाने सर्वच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षात न वाहिलेले अनेक ओढे व नाले देखील खळखळून वाहत असल्याने बळीराजा सुखावला आहे.
शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे काही प्रमाणात पिकांना फटका बसण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. पर्जन्य आकडेवारीनुसार सिन्नर मंडळात ४७ मिमी, पांढुर्ली १२.२०मिमी, नांदुर-शिंगोटे ७७ मिमी, शहा ९७ मिमी, डुबेरे ८५ मिमी तर देवपूर मंडळात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.