मालेगावला वादळासह जोरदार पाऊस

डाळिंब, कांद्याचे नुकसान; उकाड्यातून नागरिकांना दिलासा
मालेगावला वादळासह जोरदार पाऊस

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तब्बल तीन महिन्यांपासून अंग भाजून काढणार्‍या तीव्र तापमानामुळे अस्वस्थ झालेल्या शहर परिसरातील जनतेस मान्सूनपूर्व पावसाने ( Rain )जोरदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. तब्बल अर्धा ते पाऊण तास वादळीवार्‍यासह सुरू असलेल्या या मुसळधार पावसाच्या पहिल्याच तडाख्याने सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. पावसाचे आगमन होताच चिमुरड्यांनी घराबाहेर धाव घेत पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.

वादळीवार्‍यासह पावसाचे आगमन होताच शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

शहर-परिसरात यंदा मार्च महिन्यापासूनच 41 अंशावर तापमान पोहचले असल्यामुळे तीव्र उन्हाळी झळांनी नागरिक हैराण झाले होते. एप्रिल-मे महिन्यात तर तापमानाचा पारा 43 अंशावर स्थिरावला असल्याने सुर्याचा प्रकोप अंग भाजून काढणारा ठरला होता. गतवर्षी रोहिण्या देखील दमदार बरसल्या होत्या. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून मुक्तता होण्यासाठी येथे रोहिण्यांच्या पावसाची प्रतीक्षा केली जात होती. मात्र, यंदा रोहिणी नक्षत्र देखील जवळपास कोरडे गेल्याने निराशेचे वातावरण पसरले होते. गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अन्यत्र ठिकाणी मान्सूनूुर्व पावसाने हजेरी लावल्याने शहरासह तालुकावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

आज सकाळपासूनच तीव्र तापमान जाणवत होते. दुपारनंतर मात्र आकाशात काळे ढग दाटून वादळीवारे वाहू लागल्याने तापमान घसरल्याने जनतेला दिलासा मिळाला. दुपारी चारच्या सुमारास वादळीवार्‍यासह पावसाचे मेघगर्जनेसह आगमन झाले. अकस्मात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरीकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने तीव्र तापमानाने हैराण नागरीकांना दिलासा मिळाला. पहिल्याच पावसाचा आनंद रस्त्यावर येवून पावसाच्या सरीमध्ये येथेच्छ भिजून लहान मुले घेत असल्याचे दिसून आले.

महावितरण कंपनीतर्फे मान्सुनपुर्व देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी अर्धा ते पाऊणतास झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने या दुरूस्तीच्या कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पावसाचे आगमन होताच शेतमाल तसेच घरे झाकण्यासाठी प्लॅस्टीकचे कागद घेण्यासाठी किदवाईरोडवर नागरीकांनी गर्दी केली होती.

तालुक्यातील निमगाव व दाभाडी परिसरातही मान्सुनपुर्व पावसाने वादळीवार्‍यासह जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊणतास बरसलेल्या पावसामुळे दाभाडी, पिंपळगाव, दुंधे, तळवाडे परिसरात डाळींबाची झाडे उन्मळून पडली तर काढणी करून उघड्यावर ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसात भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. मोसमखोर्‍यासह माळमाथा भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र कुठेही पावसाची हजेरी लागली नसल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com