
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
गेल्या दोन - तीन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकर्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. काल दुपारी 1 वाजेच्या दरम्यान वाजता ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट आणि नंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
जानोरी येथील सोमनाथ वतार यांच्या हॉटेलवरील पत्रे उडाले तर जानोरी येथील पेठगल्ली येथे तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ यांच्या घरावरील पत्रे उडालेले आहे. ओझे येथेही अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहे. त्याचप्रमाणे अंबानेर येथे द्राक्षबागा जमिनदोस्त झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी विद्यूत खांब, तारा तुटल्या होत्या. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता.
दिंडोरी शहरात पाच ते सहा तास वीज गायब झाली होती. दिंडोरी शहरासह निळवंडी, पाडे, हातनोरे, मडकीजांब, तळेगाव दिंडोरी, वलखेड, पाडे, वनारवाडी, इंदोरे, अवनखेड, राजापूर, मातेरेवाडी, खेडगाव, कादवा कारखाना, चिंचखेड, परमोरी, वणी, अहिवंतवाडी, पांडाणे, तीसगाव, सोनजांब, तळेगाव वणी, बोपेगाव, गोंदेगाव, शिंंदवड, रत्नगड, आंबेदिंडोरी, शिवनई, वरवंडी, अक्राळे आदी ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पालखेड बंधारा परिसर
पालखेड बंधारा, कोर्हाटे, मोहाडी, जानोरी, जऊळके दिंडोरी, खडकसुकेणे येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी मजूर कामगार वर्गाची तारांबळ उडाली. विजांचा आवाज इतका भयानक होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. तर काही या हंगामातील पहिला पाऊस म्हणून भाविक भक्तांनी पूजा केली त्यामुळे शेतकरीवर्गाने पहिला पाऊस पडल्याने आनंद व्यक्त केला आहे. आता खरीप हंगाम वरील आशा वाढल्या आहे मात्र असे असले तरी जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. लखमापूर येथे आठवडे बाजार बाजारात ग्राहकांची मोठी प्रमाणात धावपळ झाली. वारे वाहत असल्याने विजेचे खांब काही ठिकाणी कोसळली आहे. आजही सकाळपासूनच नागरिक उकाड्यापासून बेजार झाले असतानाच दुपारी एक वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ननाशी परिसरात मुसळधार
ननाशीसह परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील ननाशी परिसरात आज दुपारी सुमारे तासभर पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वादळी वारे मेघगर्जनेसह तासभर दमदार पाऊस बरसत होता. गत दोन तीन वर्षांपासून परिसरात जून महिन्यात पाऊस पडत नव्हता किंबहुना कमालीच्या विलंबाने सुरवात व्हायची. वळीव पावसाचे प्रमाणही कमी झाले होते .यावर्षी मात्र जून महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन असह्य उकाडा निर्माण झाला होता .पावसाने अचानक दमदार हजेरी लावून वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला आहे .दरम्यान अचानक आलेल्या पावसमुळे नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडाली होती. शिवाय पावसाला सुरुवात होत असल्याने नागरिकांनी घरांवर प्लास्टिक टाकण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेतली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
ओझे येथे अनेक घरांचे पत्रे उडाले
ओझे, करंजवण, म्हेळुस्के परिसरात मान्सूनपुर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घराचे पत्रे उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वणी जवळील आंबानेर येथील शेतकरी किरण अशोक धुगे यांची दोन एकर द्राक्षबागा वादळी पावसाने भूईसापाट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात कुसान झाले आहे.
सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास ओझे परिसरात अचानक मोठे वादळ निर्माण होऊन जोरदार वार्यामुळे अनेकाच्या घराचे पत्रे अर्धा किलोमीटर पर्यंत जाऊ पडले आहे. विजेचे पोल पडल्यामुळे या परिसतील विजेचा पुरवठा रात्रीपासून बंद आहे. त्याप्रमाणे वादळी वार्यामुळे पत्रे उडाल्यामुळे अनेकाचे कांदे पण थोड्या फार प्रमाणात ओले झाल्यामुळे नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. ओझे येथे ग्रामसेवक धीरज भांबरे सरपंच आनंदा धुळे उपसरपंच विमलताई बर्डे यांनी घराचे पत्रे उडालेल्या घराच्या नुकसानीची पाहणी केली.