
नाशिक । प्रतिनिधी Nashik
हवामान विभागाने दोन दिवस नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काल नाशिकचे तापमान 40.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. चारच दिवसात तापमानात तीन अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे जास्त उन्हात फिरू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हाच्या झळांपासून पुरेशा संरक्षणाची तयारी करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जेव्हा मैदानी प्रदेशात तापमान वाढून कमीत कमी 40 डिग्रीपर्यंत पोहोचते, तटीय क्षेत्रात ते कमीत कमी 37 डिग्री तापमान पोहोचते आणि पर्वतीय भागात कमीत कमी 30 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचते किंवा सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्रीपर्यंत पोहोचते तेव्हा उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. महाराष्ट्रात चंद्रपूरच्या तापमानाचा पारा 42 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात जास्त फिरू नये. बाहेर पडायचे असेल तर डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपडा गुंडाळावा, डोळ्यांना गॉगल लावावा तसेच सोबत पुरेसे पाणी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालके, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.