‘निमा’तील वादावर मंगळवारी सुनावणी

निमा हाऊस
निमा हाऊस

सातपूर । प्रतिनिधी Satpur

'निमा'तील दोन गटांमधील गेल्या दोन महिन्यांपासून सूरु असलेला वाद अद्यापही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

सत्ता ताब्यात असलेल्या गटाने धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर दुसर्‍या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने हा वाद न्यायालयाच्या अखत्यारित पोहोचला आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत येत्या मंगळवारी (दि. 15) या वादावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी या प्रश्नावर अंतिमतः निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार उच्च न्यायालयाने या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी 15 सप्टेंबरपूर्व ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

निमातील सत्तेत असलेल्या गटाने धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण सादर केले आहे. निमा विश्वस्त मंडळाने नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी समितीकडे पदभार देण्यास तयार नाही, म्हणून विशेष कार्यकारी समितीचे अध्यक्ष विवेक गोगटे यांनी निमाच्या विद्यमान पदाधिकार्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जिल्ह्यातील जवळपास साडेतीन हजार उद्योजकांच्या संघटनेतील सत्तेचा दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता थेट उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. गुरुवारी या प्रकरणासंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. 15 सप्टेंबरला पुढील सुनावणीत बहुतांशी चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील उद्योजकाची संघटना म्हणून नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडे बघितले जाते. 31 जुलै रोजी दर दोन वर्षांनी या संघटनेचे नवे पदाधिकारी पदभार स्वीकारत असतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीचा हवाला देत विद्यमान कार्यकारिणीने निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मानसिकता दर्शवली होती.

निमात नेमकी कोणती घटना लागू आहे? याबाबत आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले होते निवडणूक समिती जाहीर करण्यात आली त्यावर सत्ताधार्‍यांनी आक्षेप घेतल्यानंतर बदलण्यातही आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

विशेष कार्यकारी समितीकडून न्यायालयात दाद

विश्वस्त मंडळाने नेमणूक केल्यानंतरही विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाल संपलेला असतानाही त्यांनी पदभार हस्तांतरित केलेला नाही. घटनेनुसार हे सर्व काही बेकायदेशीर असून पदभार हस्तांतरित केला जावा, यासंदर्भातील मागणी करणारी ही याचिका विशेष कार्यकारी समितीचे अध्यक्षांनी दाखल केली असून यासंदर्भात 15 सप्टेंबरला अध्यक्ष विवेक गोगटे, खजिनदार आशीष नहारा, सरचिटणीस संदीप भदाणे यांनी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com