आभाळच फाटलं थिगळ कोठवर लावणार..

काढणीला आलेली पीके सडली; आता पीक पंचनाम्याची प्रतीक्षा
आभाळच फाटलं थिगळ कोठवर लावणार..

निफाड। आनंदा जाधव | Niphad

यावर्षी प्रारंभीसह परतीच्या पावसाने जोरदार हाहाकार (heavy rain) उडवून दिल्याने हातात आलेली उभी पीके पाण्यात सडली. अद्याप देखील जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

कुटुंबाचा गाडा ज्या शेतीच्या भरवशावर चालवावयाचा त्याच शेतातील पिकांची पुरती वाट लागल्यामुळे शेतकर्‍यापुढे जिवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच पीके उभी करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे अन् आता रब्बीचे पीके कधी घ्यायचे याचे उत्तर मिळत नाही. पावसाच्या तडाख्यातून एकही परिसर सुटू शकला नाही. त्यामुळे सारीच पीके उद्धवस्त (crop damage) झाल्याने शेतकर्‍यांचे (farmers) नियोजन कोलमडून पडले आहे.

त्यातच पाऊस अद्यापही उघडण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होत असतांनाही शासन स्तरावरून अद्याप पीक नुकसानीचे पंचनामे (panchanama) होत नसल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्याचा कॅलिफोर्निया (California) म्हणून एकेकाळी निफाडची (niphad) ओळख होती. ऊस, कांदे, द्राक्षे, भाजीपाला आदी नगदी पीके घेण्यात येथल्या शेतकर्‍याची खासियत आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीपुढे (natural disaster) शेतकर्‍याचे नियोजन कोलमडून पडू लागले आहे. त्यातच खते, बियाणे, औषधांच्या भरमसाठ वाढणार्‍या किमती अन् मजूर टंचाईचे संकट पाठ सोडावयास तयार नाही.

कधी विजेचे भारनियमन तर कधी पाणीटंचाई (water scarcity). यावर्षी तर प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण दिसत होते. मात्र आता शेतातील मका, सोयाबीन, टोमॅटो काढणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच पावसाने दररोजच जोरदार हजेरी लावणे सुरू केले आहे. शेतात साचणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे उभी पीके आडवी पडून सडू लागली आहे तर द्राक्षवेलीच्या मुळ्या चोकअप होण्याबरोबरच वेलींना मोठ्या प्रमाणात फुटवे लागले आहेत. त्यामुळे यावर्षी द्राक्षबागा देखील उभ्या राहणार आहे.

उभ्या पिकांची ही अवस्था असतांनाच मागील वर्षी पिकविलेल्या उन्हाळ कांद्याला (summer onion) पुढे भाव भेटेल या आशेवर शेतकर्‍यांनी तो चाळीत साठविला. मात्र हाच साठविलेेला कांदा आता खराब होत असतांनाही भाव वाढण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. केंद्र सरकारला (central government) शेतमाल पिकविणार्‍यांऐवजी खाणार्‍यांचीच जास्त काळजी असल्याने शेतीमालाचे भाव वाढणार नाहीत याची पुरेपुर काळजी घेतली जात असल्याने शेती आणि शेतकरी (farmers) अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागला आहे. यावर्षी तर निसर्गाने देखील जणू शेतकर्‍याची परिक्षाच पाहण्याचे ठरविलेले दिसते.

सततच्या पावसामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. तर शिवार ओलाचिंब, सर्वत्र दलदल त्यामुळे दुभती जनावरे कोठे बांधावी याचे उत्तर मिळत नाही. पावसामुळे हातात आलेली पीके वाया गेली. मात्र अद्याप देखील शासन स्तरावरून पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश नाहीत. सर्वच बाजूने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. ‘आभाळचं फाटलं तिथं थिगळ तरी कोठवर लावणार’. शेतकर्‍याचे कैवारी म्हणून मिरवणारे राज्यकर्ते देखील आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर फारसे गंभीर होतांना दिसत नाही.

शेतकर्‍यांना खते, बियाणे, औषधांमध्ये सवलत देण्याऐवजी स्वताची व त्यांच्या खात्यावरील जाहिरात बाजी करून मिरविण्यातच धन्यता मानली जात आहे. निवडणुका आल्या की शेतकर्‍याप्रती कळवळा दाखविणारे निवडून गेल्यावर मात्र ‘मी नाही त्यातली’ च्या अविर्भावात वावरतांना दिसत आहे. एकूणच शेतकर्‍यांची अवस्था म्हणजे ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशीच काहिशी झाली आहे. त्यातच शासन शेतकर्‍याऐवजी शासकीय कर्मचार्‍यांचे लाड पुरविण्याला धन्यता देत आहेत. त्यासाठी सातवा, आठवा आयोग तर शनिवार, रविवार सुट्टी याबरोबरच हक्काच्या सुट्टया तर शेतकर्‍याला मात्र एक दिवस देखील विश्रांती नाही.

उलट कष्टाने पिकविलेल्या मालाला घामाचे दाम कधी मिळेल याचीच चिंता शेतकर्‍यास सतावत आहे. त्यामुळे शासनाने फुकटच्या सर्व योजना बंद करून नागरिकांना कामाची सवय लावावी. मात्र हे सरकार जनतेला आळशी बनवून शेतकरी, व्यापारी तसेच कष्टकर्‍यांची लुट करण्याला प्राधान्य देतांना दिसत आहे. मात्र पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तिबार पेरणी करूनही पीक हातात आले नाही. सततच्या पावसामुळे फळ पिकावर फवारणी करणे शक्य नसल्याने कीड नियंत्रणाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे अशा प्रसंगी शासनाने निफाड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com