
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आमच्या टेरेससमोर एक सिल्वर ओक चे झाड आहे. एप्रिलमध्ये ते पिवळ्या फुलांनी बहरून जाते. या वृक्षाला फुले येतात हे अनेकांना माहितच नाही. सकाळी आठ ते दहा जातीचे पक्षी या वृक्षावर किलबिलाट करत असतात. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना आपल्या परिवारासाठी आपण बाहेर पडायचे नाही हे मी ठाम ठरविले होते.
गेली पंधरा वर्षे मी रविवारी कधीच घरी राहत नाही. लॉकडाउनच्या काळात रोज सकाळी पाच वाजता उठून एक तास व्यायाम करायचा आणि हातात कॅमेरा घेवून दोन तास पक्षी निरीक्षण आणि क्लिक क्लिक करीत बसायचे हा रोजचा जणू दिनक्रम झाला होता. त्या दिवशी मी सकाळी टेरेसवर गेलो. समोरच्या निलगिरी वृक्षावर बुलबुलची जोडी बसली होती. मी त्याचे निरीक्षण करीत होतो आणि अचानक मला एक पक्षी त्या झाडावर येवून बसल्याचे दिसले. त्याला बघितल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.
ज्या पक्ष्याला बघण्यासाठी मी त्रंबक, हरसूल, पेठ, आदी भागात जात होतो तो पक्षी चक्क शहराच्या मध्यवस्तीत-माझ्या घरोसमोर आला होता. जणू ही कोरोनोची कृपा असावी. इतका देखणा पक्षी माझ्या समोर बसला होता. हा तोच होता, हरियाल! आपल्या राज्याचा राज्यपक्षी. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील शेड्युल चार मध्ये हा पक्षी येतो. हे कळपांमध्ये आढळतात. त्यांच्या शरीराचा रंग हलका पिवळसर हिरवा ऑलिव्ह फळासारखाच आहे. त्यांच्या डोक्यावर हलके निळे तपकिरी केस आणि पाय पिवळ्या रंगाचे असतात. ज्यामुळे ते सहजपणे ओळखले जाऊ शकतात. असे म्हणतात की हे पक्षी कधीही जमिनीवर पाऊल ठेवत नाहीत. हरियाल झाडांवर राहतात. कवी कालिदासाने हरियालचे वर्णन केले आहे. कालिदास नमूद करतात, रघुची सेना मलय पर्वतातल्या प्रदेशांवर पोहोचली जिथे हरित मिरपूडच्या जंगलात उडत होते. त्यांनी हरियालबद्दलच्या या आख्यायिकेचा उल्लेखही केला आहे.
गही टेक छूटयो नहीं, कोटिन करौ उपायध्हारित
धर पग न धरै, उड़त-फिरत मरि जाय ।
या पक्ष्याची शिटीसारखी बोली खूप गोड आहे, त्याची शिकारही जास्त होते. हे पक्षी हिमालय ते कन्याकुमारी आणि पूर्वेस राजस्थान ते आसाम पर्यंत आढळतात. सदाहरित वन वृक्षांमध्ये हा पक्षी मोठ्या संख्येने दिसतो. हे पक्षी 26 वर्षां पर्यंत जगू शकतात.
( नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा लिखित मकोरोना आणि पक्षी जीवन या अप्रकाशित पुस्तकातून साभार)