
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील वाहनधारक स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी केली.
राष्ट्रीय राज्यमार्ग 848 हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरातला जातो. अनेक कामे प्रलंबित असताना टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाल्याने जनतेत प्रचंड रोष व्यक्त होत होता. त्यातच कामे न झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.
तसेच टोल परिसरातील २० किमीच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देत नसल्याने प्रचंड वाद निर्माण झाला. अखेर या तीनही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवेदनानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील वाहनधारक जनतेस सवलतीबाबत सकारात्मक विचार करू, असे सांगितले. यावेळी नासिकचे खासदार हेमंत गोडसे, समीर चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
आता फ्रेश वाटताय तुम्ही...
दरम्यान, हरिश्चंद्र चव्हाण तब्येतीच्या कारणास्तव विजनवासात असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण पुन्हा एकदा ॲक्टिव झाल्याचे पाहून दिंडोरी मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबद्दल नितीन गडकरी यांनीदेखील "आता फ्रेश वाटताय तुम्ही" असा उल्लेख करून त्यांचा उत्साह वाढवला.