'हर घर तिरंगा' उपक्रम : मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष

मनपात तिरंगा झेंडे उपलब्ध
'हर घर तिरंगा' उपक्रम : मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत( Har Ghar Tiranga Campaign) नाशिक शहरात दोन लाख घरांवर तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेला विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून दोन लाख झेंडे प्राप्त झाले असून त्यांची विक्री सुरू झाली आहे. विना दांड्याच्या झेंड्याची किंमत 21 रुपये आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली.

शहरातील सर्व सहा विभागीय कार्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून परिसरातील घरांच्या संख्येनुसार त्यांना झेंडे उपलब्ध करून देण्यात आले.दरम्यान, येत्या सोमवारी 8 तारखेला महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहरातील महत्त्वाच्या विविध संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये त्यांच्याकडील सीएसआर फंडाच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेकडून किमान 50 हजार झेंडे विकत घेऊन त्याचे वितरण नागरिकांमध्ये करावे, असा उद्देश महापालिकेचा आहे. सुमारे दीड लाख झेंडे हे महापालिकेच्या माध्यमातून विक्री होणार आहे. पूर्वी दांड्यासह झेंडा मिळणार होता, मात्र आता दांड्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम होत आहे. प्रत्येक विभागात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी आपली मागणी नोंदवून आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी,21 रुपये देउन झेंडा खरेदी करायचा आहे तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तो आपल्या घरावर किंवा इमारतीवर फडकवायचा आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम

महोत्सव अंतर्गत महापालिका मुख्यालयासह शहरातील सर्व विभागीय कार्यालयांवर तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील सर्व कार्यालय तसेच महापालिका मुख्यालय येथे राष्ट्रीय पोशाखांमध्ये सर्व अधिकारी व सेवकांनी यायचे असून राष्ट्रगीत समूहगान होणार आहे. त्यासाठी त्या दिवशी सुट्टी असली तरी ती रद्द करण्यात आली असून प्रत्येकाला येणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विभागनिहाय झेंडा वितरणाची संख्या

नाशिक पश्चिम 9060, सातपूर 29562, नवीन नाशिक विभाग 53588, नाशिक रोड विभाग 34924, पंचवटी विभाग 41189 तर नाशिक पूर्व विभागात 25725 याप्रमाणे झेंडे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com