हापूस आंब्याची समुद्रामार्गे अमेरिका वारी

हवाई मार्गापेक्षा खर्चात बचत होत असल्याचे व्यापार्‍यांचे प्रतिपादन
हापूस आंब्याची समुद्रामार्गे अमेरिका वारी

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा भारतीय केशर आंब्याची (Saffron Mango) समुद्रा मार्गे प्रथमच पाठविलेला आंबा (mango) अमेरीकेच्या (america) बाजारपेठेत सुस्थितीत पोहचला आहे. दि.5 जून रोजी मुंबई (mumbai) येथून कृषि पणन मंडळाच्या (Agricultural Marketing Board) सुविधेवरून पाठविलेला आंबा अमेरीकेच्या बाजारपेठेत दि.2 जुलै रोजी दाखल झाला आहे.

भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर (Bhabha Atomic Research Center), महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (Maharashtra State Agricultural Marketing Board), अपेडा आणि सानप अ‍ॅग्रोनिमल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अमेरीकेत समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्यात आला. आंब्याचा कंटेनर दि.30 जून 2022 रोजी अमेरीकेतील नेवार्क बंदरात दाखल झाला. दि.1 जुलै रोजी आयातदार मे. अनुसया फ्रेश प्रा.लि. यांनी कंटेनर ताब्यात घेऊन उघडल्यानंतर कंटेनर मधील आंबा सुस्थितीत पोहचल्याचे निदर्शनास आल्याने आंब्याचे आयातदार आणि निर्यातदाराने समाधान व्यक्त केले.

भारतातून सन 2022 मध्ये अमेरीकेस सुमारे 1100 मे.टन आंबा निर्यात झाली आहे. सध्या अमेरीकेला होणारी आंबा निर्यात 100 टक्के हवाईमार्गे होत आहे. यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे 550 रु. विमान भाडे अदा करावे लागत असल्यामुळे अमेरीकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा (Indian mango) किंमतीच्या दृष्टिने महाग पडत असून निर्यातीवर (Export) मर्यादा येत आहेत.

सदर बाब लक्षात घेऊन भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरद्वारे पाठविण्याचा निर्णय घेऊन मे. सानप अ‍ॅग्रोनिमल्स चे संचालक हेमंत सानप या निर्यातदाराच्या मदतीने आंबा निर्यात केला. आंबा हंगाम 2022 मध्ये कंटेनरद्वारे आंबा थेट अमेरीकेत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले.

याकरीता अमेरीकेत आंबा निर्यात करणार्‍या निर्यातदारांच्या बैठका घेण्यात आल्या. कंटेनरसाठी दि. 29 मे 2022 ते 2 जून 2022 असे पाच दिवस आंबा नोंदणीकृत बागांमधून तोडणी करुन कृषि पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र वाशी, नवी मुंबई येथे आणण्यात आला. भाजीपाला प्रक्रिया केंद्र येथे सदर आंब्याची प्रतवारी करुन त्यावर सोडीयम हायपोक्रोराईटची 52 डि.से. तापमानात तीन मिनिटांची प्रक्रिया करून आंबा सुकविण्यात आला. त्यानंतर सदर आंब्यावर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरने विकसीत केलेल्या रसायनाची पाण्यामध्ये तीन मिनिटांची प्रक्रिया करुन पुन्हा आंबा सुकविण्यात आला.

सदर आंबा तीन किलोच्या बॉक्स मध्ये भरुन त्याची विकिरण सुविधा केंद्रात वाहतूक करुन त्याचे अमेरीकन इस्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. च्या अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मान्यतेनंतर आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येवून त्यानंतर आंबा प्रशितकरण करुन त्याची साठवणूक शितगृहात करण्यात आली होती. एकूण 5520 बॉक्सेसमधून 16,560 किलो आंबा कंटेनरद्वारे दि.3 जून 2022 रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदराकडे रवाना करण्यात आला. तेथून दि.5 जून 2022 रोजी सदर कंटेनर अमेरीकेकडे रवाना झाला.

कंटेनर अमेरीकेत नेवार्क या न्यु जर्सी शहराजवळील बंदरात दि.29 जून 2022 रोजी म्हणजे 25 दिवसांनी पोहोचला. आंबा समुद्रमार्गे निर्यात सुरू झाल्यास अमेरीकेत आंब्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. तसेच आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. भारतातून हवाईमार्गे आंबा निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो 550 रुपये खर्च च्या तुलनेत समुद्रामार्गे निर्यात केल्यास 100 रुपये प्रति किलोचा खर्च येतो. हवाईमार्गे आणि समुद्रामार्गे वाहतूक खर्चाचा विचार केल्यास प्रतिकिलो 450 रुपयांची किलोप्रमाणे बचत होत असल्याचे निर्यातदार हेमंत सानप यांनी सांगितले. कमी खर्चामुळे आता हवाई मार्गापेक्षा समुद्रामार्गे आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत मिळू लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com