एच.ए.एल.ने शेतकरी, नुकसानग्रस्तांचे प्रश्न तत्काळ सोडवावे : खा. डॉ. पवार

एच.ए.एल. अधिकाऱ्यां समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
एच.ए.एल.ने शेतकरी, नुकसानग्रस्तांचे
प्रश्न तत्काळ सोडवावे : खा. डॉ. पवार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

एच.ए.एल.कडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवावेत, अशा सूचना खा. डॉ. भारती पवार यांनी केल्या.

एच.ए.एल.कडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याकरिता नागरिकांसह, शेतकरी आसपासच्या गावातील सरपंच तसेच ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नसल्याने अखेर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी खा. डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीत एच. ए. एल.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या मागणी केली होती.

जिल्हाधिकारी यांनी खा. डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एच. ए.एल. अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी खासदार डॉ. पवार यांनी वरील सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नुकसानग्रस्त शेतकरी, जानोरी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच ओझर परिसरातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत शिरवाडे वणी येथे विमान कोसळून तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान झाले होते. परंतु , त्यांना अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी.

तसेच जानोरी ग्रामपंचायतीचा थकीत कर लवकरात लवकर वर्ग करावा. त्याचप्रमाणे करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता एच.ए.एल.ने नियमित दळणवळणातील बंद केलेला रस्ता त्वरित खुला करावा, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील गावांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांना दिलासा मिळेल.

यासह आदी प्रश्न लवकरात लवकर एच.ए.एल. प्रशासनाने मार्गी लावण्याच्या सूचना ह्या बैठकी प्रसंगी करण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com