गुरुपौर्णिमा विशेष : गुरूने शिष्याला दिला अनमोल दृष्टिकोन

गुरुपौर्णिमा विशेष : गुरूने शिष्याला दिला अनमोल दृष्टिकोन
USER

नाशिक । ज्ञानेश्वर जाधव Nashik

भारतात पुराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे.( India has a Guru-Shishya tradition since ancient times ) ‘गुरू’ म्हणजे आयुष्य घडविणारी व्यक्ती आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. शिष्याचे आयुष्य घडवून त्यात ज्ञानरुपी प्रकाश टाकण्याचे काम गुरू करत असतो आणि त्याच गुरूप्रती असलेला आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी शिष्याकडून गुरूला दक्षिणा दिली जात असे.

ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आजही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. एका घटनेत गुरूनेच शिष्यप्रति असलेली बांधिलकी दाखवत शिष्याच्या जीवनात येणार्‍या संभाव्य अंधारात प्रकाश टाकण्याचे कार्य केले आहे.

चांदोरी( Chandori ) येथील भैरवनाथ नगर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील ( ZP School )काही वर्षांपूर्वी चौथी इयत्तेत शिकणार्‍या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील भारत सोमनाथ हिरे नामक विद्यार्थ्याला लिहिण्या, वाचण्यात अडचण निर्माण होत होती. अक्षरे आणि अंकांच्या ऐवजी तो पाटीवर फक्त रेषाच ओढत असे. एवढेच काय तर कधी कधी चालतांना चाचपडत चाले. ही बाब त्याच्या शिक्षिकेच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः भारतला डोळ्यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी डोळे तपासले असता त्याला तब्बल उणे 18(-18) एवढा चष्म्याचा नंबर निघाला.

अजून थोडा उशीर झाला असता तर भारतला आपली दृष्टी गमवावी लागली असती ही बाब डॉक्टरांनी शिक्षिकेच्या लक्षात आणून दिली. त्यांनी सर्व औषधोपचार करत भारतला चष्मा घेऊन दिला. एवढ्यावरच न थांबता शिक्षिकेने अधिक मेहनत घेत भारतला पहिल्यापासून शिकवण देत त्याला इतर मुलांच्या बरोबरीने लिहिता वाचता येईल इतके सक्षम बनवले. आज तो विद्यार्थी आठवीच्या वर्गात इतर मुलांप्रमाणेच यशस्वीपणे शिक्षण घेत आहे. आज त्याचे शिक्षक आणि शाळा बदलली असली तरी आपल्या जीवनात प्रकाश टाकणार्‍या ‘त्या गुरूंना’ भारत दर गुरुपौर्णिमेला फोन करून आपली कृतज्ञता व्यक्त करतो.

आधुनिक स्पर्धात्मक युगात आज सर्वकाही बदलले आहे. असे असले तरी आजही अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदरभाव व्यक्त करताना त्यांना काहीतरी भेटवस्तू देतात. गुरू लांब असले तर निदान फोनद्वारे शुभेच्छा तरी देतात. मात्र या ठिकाणी गुरूकडूनच शिष्याला मिळालेली अनमोल दक्षिणा म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कोणत्याही शिक्षकाचे विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणे हे काम आहे. भारत आज इतर मुलांप्रमाणे आपले आयुष्य नॉर्मल जगत आहे. याचा जास्त आनंद वाटतो. शिष्याची प्रगती हीच गुरुसाठी असलेली सर्वात मोठी गुरूदक्षिणा असते.

- जयश्री वाकचौरे (भारतच्या शिक्षिका)

माझा मुलगा आज जे काही आहे तो त्याच्या शिक्षिकेमुळे आहे. त्यांनी योग्य वेळी भारतला दवाखान्यात नेले. त्यामुळे आज तो 8वी इयत्तेपर्यंत पोहोचला. त्याचे शिक्षण आता व्यवस्थित सुरू आहे. पुढेही तो चांगले शिक्षण घेईल याची मला खात्री आहे.

- सोमनाथ हिरे (भारतचे वडील)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com