गुरुनानक जयंती विशेष : मानवता आणि लोककल्याणाचे ‘गुरू’ श्री गुरुनानक देवजी

गुरुनानक जयंती विशेष : मानवता आणि लोककल्याणाचे ‘गुरू’ श्री गुरुनानक देवजी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शीख धर्माचे संस्थापक Founder of Sikhismया नात्याने गुरुनानकजी यांनी केलेले कार्य महान आहे. शीख धर्म ‘अकाल पुरख’ची भक्ती करण्याचा उपदेश करणारा थोर धर्म आहे. 1469 मध्ये तलवंडी जिल्ह्यातील (लाहोर) शेखपुरा येथे गुरुनानकजींचा Gurunanak जन्म झाला. हल्ली हा प्रांत पाकिस्तानात समाविष्ट आहे. त्यांच्या वडिलांचे नाव काळूजी तर मातोश्रींचे नाव त्रिपतीजी होते. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव नानकीजी होते. वडील पटवारी व्यवसाय करीत.

गुरुनानक यांना वयाच्या सातव्या वर्षी गोपाळ पंडित या विद्वान गृहस्थांकडे हिंदी शिकण्यासाठी तर वयाच्या 13 व्या वर्षी मौलवी कुतुबुद्दीन यांच्याकडे फारसीचे ज्ञान घेण्यासाठी पाठवण्यात आले. कुमार वयातच नानकजींनी या दोन्ही भाषा सहज आत्मसात केल्या. विद्यार्थीदशेतच त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून त्यांच्या अध्यापकांनी तसेच सहाध्यायींनी त्यांचा सतत आदर केला. त्यांचे अध्यापकही त्यांचा व्यासंग पाहून त्यांच्यापुढे नतमस्तक होत.

नवव्या वर्षी गुरुनानकजींना विधिवत जानवे घालण्याकरता पंडित हरदयाल या शास्त्रींना पाचारण करण्यात आले. मात्र नानकजींनी ते नाकारले. केवळ जानवे घातल्यामुळे माणसाला कोणताही आत्मिक लाभ होत नाही, असे ते म्हणाले. दया, क्षमा, संतोष, शांतता असे गुण धारण करणे हे जानवे धारण करण्यापेक्षा उचित आहे, असा उपदेश त्यांनी या पंडितांना केला. अठराव्या वर्षी गुरुनानकजींचा विवाह बटाला येथील मलचंदजी यांची सुकन्या सुलक्षणीजी यांच्याशी झाला. बाबा श्रीचंदजी व बाबा लक्ष्मीदासजी असे दोन सुपुत्रही त्यांना लाभले.

एकदा गुरुनानकजींच्या वडिलांनी त्यांना 20 रुपये दिले आणि यातून चांगला सौदा-व्यापार-व्यवहार करण्यास सांगितले. मात्र गुरुनानकजींनी या पैशातून साधूंना भोजन दिले. पैशांचा अन्नदानादाखल केलेला हा विनियोग म्हणजे ‘सच्चा सौदा’ असल्याचे त्यांनी सांगितले. या स्थळी आजही ‘सच्चा सौदा गुरुद्वारा’ या नावाची वंदनीय वास्तू उभी आहे. गुरुनानकजींना कीर्तनाची खूप आवड होती. ते कीर्तन हा ‘अकाल पुरख’ला जोडणारा दुवा मानत. ते आपल्या स्नेही-साथीदारांसमवेत राग कीर्तन खूपच रंगवून करीत. आपल्या आजोबांच्या व्यवसायात (मोदीखाना) काम करीत. मात्र आपल्या चरितार्थाच्या या साधनातील उत्पन्नाचा मोठा भाग गरजू लोकांना दान करीत. हे मोठे समाजकार्य होते. मात्र ते न रुचलेल्या लोकांनी नवाब दौलत खान यांच्याकडे नानकजींची तक्रार केली. ते मोदीखाना लुटत आहेत, अशी तक्रार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. धान्याची मोजणी झाली तेव्हा मात्र धान्यसाठा हिशेबापेक्षाही अधिक निघाला. हा चमत्कार पाहून आणि गुरुनानकजींमधील थोरवीची जाणीव होऊन नवाब दौलत खान गुरुनानक यांचा शिष्य झाला.

सुलतानपूरजवळच्या वेई नावाच्या नदीपात्रात गुरुनानकजी रोज स्नानासाठी जात. एक दिवस ते तेथे अचानक ‘अदृश्य’ झाले आणि तिसर्‍या दिवशी नदीपासून 2 मैल दूर असलेल्या ठिकाणी प्रकट झाले. या ठिकाणापासून त्यांनी आपल्या धार्मिक, आध्यात्मिक प्रचाराचा शुभारंभ केला. ‘कोणी हिंदू ना कुणी मुसलमान, सगळी मानवजात एकसमान’ असे त्यांच्या शिकवणुकीचे सार होते. प्रत्येकाने आपापली प्रार्थना खर्‍या तळमळीने व मनापासून करावी, असा उपदेश त्यांनी या सर्व लोकांना दिला. गुरुनानक यांनी लोकांच्या कल्याणासाठी भारतभर भ्रमण केले. यातील प्रमुख स्थळे 4 ‘उदासी आखाडे’ म्हणून सर्वज्ञात आहेत. या भ्रमणादरम्यान त्यांनी ऐमनाबाद, हरिद्वार, प्रयाग अशा विविध ठिकाणी लोकांना धार्मिक उपदेश केला. विविध धर्मातील अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींकडे निर्देश करून त्यांनी खर्‍या भक्तीची महती सार्‍या देशबांधवांना सांगितली. असे देशाटन करीत ते पुन्हा सुलतानपूर येथे आले. तेथे त्यांची त्यांच्या परिवाराशीपुनर्भेट घडली.

आपल्या या ‘गुरुमत’ धर्म प्रबोधन काळात त्यांनी हजारो मैल पायी प्रवास केला. 1516 च्या जानेवारी महिन्यात त्यांनी करतापूर नावाच्या नव्या शहराची स्थापना केली. येथे दिवसभर कीर्तने होत असत. येथे भाई लहनाजी त्यांच्या संपर्कात आले. नानकजींची वाणी ऐकून आणि त्यांची महानता जाणून त्यांनी नानकजींचा उपदेश स्वीकारला. 1532 पासून 1539 पर्यंत भाई लहनाजींनी गुरुनानकांची अविरत सेवा केली. त्यांचा शब्द न शब्द पाळला. ही निष्ठा बघून गुरुनानकजींना ते ‘गुरुगादी’ बहाल करण्यास योग्य असल्याची खात्री पटली. त्याप्रमाणे नानकजींनी लहनाजींना गुरुगादी प्रदान केली. त्यांचे नाव गुरू अंगदजी असे ठेवले. गुरुनानकजींनी 18 वर्षे या परिसरात व्यतीत केली.

अखेरीस 22 सप्टेंबर 1539 रोजी ते इहलोकीचा निरोप घेऊन परमात्मरूपात विलीन झाले. त्यांनी 19 रागांत ‘गुरुवाणी’चे पठण केले. गुरुनानक थोर साक्षात्कारी आणि पुरोगामी विचारसरणीचे धर्मसंस्थापक होते. स्त्रीला नेहमीच पुरुषांच्या बरोबरीने प्रतिष्ठा दिली पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली. स्त्रीचा सन्मान हा सार्‍या समाजाचा सन्मान मानला. हिंदूंचा ईश्वर, मुस्लिमांचा अल्ला तसेच अन्य सर्व धर्मातील पूजनीय अशी दैवते ही जगात सर्वज्ञ असून सर्व मानव समूह हा एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

परस्परात वैर बाळगू नका, प्रेमाने व बंधुभावाने राहा, अंधश्रद्धा, गैररुढींपासून दूर राहा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकाने केलेले सदाचारण व धर्मातील तत्त्वांचे केलेले पालन हीच परमात्म्याच्या आणि या जगातील सर्वश्रेष्ठ अशा त्या ‘नियत्या शक्ती’च्या प्राप्तीसाठी केलेली खरी प्रार्थना असल्याची शिकवण त्यांनी मानवाला दिली. त्यांचे जीवन हेच त्यांचे तत्त्वज्ञान होते. आपल्या अमोघ वाणीने केलेल्या कीर्तनातून, अनुभवसिद्ध आणि तर्काधिष्ठीत विवेचनातून त्यांनी लोककल्याणाचा दिव्य संदेश समाजाला दिला. गुरुनानकजींचे हे कार्य महान आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com