'गुंडा पथक' ठरतेय गुन्हेगारांचा कर्दनकाळ

चार महिन्यांत 16 आरोपी जेरबंद; गुन्हेगारी संपवण्यासाठी पथक
'गुंडा पथक' ठरतेय गुन्हेगारांचा कर्दनकाळ

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त आणि राज्यातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून नावरूपाला येण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राबवलेला पॅटर्न नाशिकमध्येही सुरू केला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. एकट्या गुंडाविरोधी पथकाने गत चार महिन्यांत तब्बल 16 आरोपींना जेरबंद केले आहे तसेच शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यास हे पथक सतत कार्यरत आहे.

2023 या नवीन वर्षात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चार विशेष पथकांची निर्मिती केली होती. ही पथके नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रामुख्याने शहरातील टवाळखोरीचा नायनाट करण्यासाठीचा गुंडा स्कॉड अधिक प्रभावीपणे राबवण्याचा मानस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने कारवाईदेखील सुरू असल्याचे दिसत आहे.

नाशिक पोलीस आयुक्त म्हणून शिंदे यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी कामकाजाचा आढावा घेत, नवनवीन सूचना व आदेश देत शहरातील दृश्य पोलिसिंगवर भर देण्यास सुरुवात केली आहे. शहरात अनधिकृतरीत्या उभारलेले होर्डिंग्ज आणि त्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल केले. दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करत कर्णकर्कश आवाज करत रॅश ड्रायव्हिंग करणार्‍या चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या काही महिन्यांपासून मरगळलेली शहर पोलिसिंग अचानक चार्ज झाल्याचे दिसत आहे. गुंडाविरोधी पथकसह खंडणी, दरोडा व शस्त्रे, अंमली पदार्थ अशा चार स्वतंत्र पथकांची स्थापना केली.

हरियाणात कारवाई

मागच्या महिन्यात अवघ्या नाशिक शहराला हादरवून टाकणारी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील फाळके स्मारकाजवळ घडली होती. एका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोगरे यांचा रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला होता, तर आरोपींचा काहीही सुगावा नव्हता. अशावेळी शहर पोलीस दलाने उत्तम कामगिरी करत एका नवीन पॅन्टच्या पिशवीतून मिळालेल्या बिलाच्या आधारे आरोपींना जेरबंद केले.

यामध्ये गुंडा पथकाची कामगिरी विशेष ठरली. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पथकाने थेट हरियाणात जाऊन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्याचप्रमाणे नवीन नाशिकमधील कोष्टी गोळीबार प्रकरणातील 14 आरोपींना याच पथकाने जेरबंद केले आहे. याचप्रमाणे आतापर्यंत विनापरवाना शस्त्र बाळगल्या- प्रकरणी आठ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुंडाविरोधी पथकाला यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे शहरातील विशेष करून झोपडपट्टी भागात दादागिरी करणार्‍या तसेच लहान-मोठ्या टोळ्यांवर या पथकाची बारीक नजर असते. हे विशेष पथक पोलीस ठाणेनिहाय संशयित, हिस्ट्री शिटर, सराईतांची यादी तयार करून त्यावर काम करते. पथकांवर नियंत्रण थेट आयुक्तालयातून होते. विशेष म्हणजे गल्ली-बोळातील गुंडांची धरपकड करून कारवाईचे आदेश आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येत आहे.

शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आमचे काम सुरू असते. प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क करावा. पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी असून विश्वासाने आमच्याकडे यावे, पोलीस आपले कर्तव्य बजावत असते.

- ज्ञानेश्वर मोहिते, प्रभारी गुंडाविरोधी पथक, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com