Yuva Mitra
Yuva Mitra|Counseling Van
नाशिक

'युवा मित्र'च्या समुपदेशन केंद्रात ३४० बाधीतांना मार्गदर्शन

आजाराबाबत मार्गदर्शन करतानाच गैरसमजही केले जातात दूर

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी

युवा मित्र आणि सिन्नर तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ समुपदेशन केंद्राकडून महिनाभरात ३४० व्यक्तींना करोना आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले असून या आजाराबाबतचे गैरसमज दूर करण्याबरोबरच त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही देण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. तसेच दूरचित्रवाणीवरील बातम्यांमुळे आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये या आजाराविषयी अनेक गैरसमज तसेच भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बरेच लोक शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करतांना दिसून येत नाहीत.

तसेच विलगीकरणाच्या सूचनांचे सुद्धा पालन त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे घरातील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे बाधित आणि अबाधित व्यक्तींना हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यासाठी जुलै महिण्यामध्ये सिन्नर-घोटी महामार्गावरील युवा मित्रच्या प्रांगणात समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले होते.

संस्थेचे कार्यकारी संचालक सुनील पोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातले हे पहिलेच समुपदेशन केंद्र सुरु झाले होते. या समुपदेशनामध्ये बाधित व अबाधित लोकांनी काय काळजी घ्यावी, दररोज कुठला व्यायाम करावा, दिवसातून ३ ते ४ वेळा हळदी टाकून गरम पाणी प्यावे, सकारात्मक विचार ठेवावा आणि ज्या सूचना त्यांना रुग्णालयातून मिळाल्या आहेत, त्यांचे पालन करावे असे सांगण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्याकडून आलेल्या शंकांचे निराकरणसुद्धा करण्यात येते.

आतापर्यंत सुमारे ३४० व्यक्तींना या केंद्राच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरुन समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती 'युवा मित्र'च्या रूपल देशमुख यांनी दिली. त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील आणि डॉ. सुप्रिया वेटकोळी यांनी वेळोवेळी सहाय्य केले.

माझी आई कोरोना बाधित होती आणि ती यामुळे खूप जास्त घाबरलेली होती. पण तिला तसेच आमच्या कुटुंबाला मिळालेल्या समुपदेशनामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना मदत होत आहे. त्यासाठी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाच्यावतीने युवा मित्र तसेच वैद्यकीय विभागाचे आभार मानतो.

सलील शेख, बारागाव पिंप्री

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com