जिल्हा परिषदेकडून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

करोना नियम पाळा; शिक्षणाधिकारी कदम यांचे आवाहन
जिल्हा परिषदेकडून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन शैक्षणिक वर्षाला ( New Academic Year ) बुधवार दि.15 जूनपासून प्रारंभ होत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करताना कोविडच्या ( Covid )नियमांचे पालन करावे. 13 व 14 जून दरम्यान शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून वर्ग खोल्यांची स्वच्छता, शालेय आवाराची साफसफाई, सॅनिटायझर, तपमान तपासण्याची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंग या सर्व खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

सन 2022 व 2023 या नवीन शैक्षणिक वर्षाला येत्या 15 जूनपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांची पूर्वतयारी, शालेय प्रशासकीय कामकाज आणि कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना करावयाच्या या संदर्भात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची जिल्हास्तरीय सहविचार सभा रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी कदम यांनी मुख्याध्यापकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्यानिमित्ताने मार्गदर्शन केले.

यावेळी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. पेपर तपासणी, निकाल, विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजनांची माहिती दिली. डायचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बढे यांनी एससीईआरटी व डायट नाशिकच्या प्रशिक्षण व योजनांची माहिती दिली. यावेळी सुधीर पगार, दरंदल, मनीषा पिंगळकर, शिवराम बोटे, एफ. डब्ल्यू. चव्हाण आदी उपस्थित होते.

या सहविचार सभेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीन बनसोड यांनी मुख्याध्यापक व प्राचार्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोविड काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. गुणवत्तेचा आलेख खालावला आहे. त्यामुळे या वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना मेहनत घ्यावी लागेल. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

एक हजार मुख्याध्यापकांची उपस्थिती

या सहविचार सभेस नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सुमारे एक हजार मुख्याध्यापक सहभागी झाले होते. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या सूचनांची माहिती जाणून घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com