
नाशिक | फारुक पठाण | Nashik
कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्सचा (MD Drugs) ‘उद्योग’ पोलीस आयुक्तालय (Police Commissionerate) हद्दतीत सुरू होता, तरी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) येथे येऊन छापा (Raid) मारुन कारवाई करावी लागली. यानंतर नाशिकसह पुणे, मुंबई आदी ठिकाणी ‘त्या’ ड्रग्स माफियाचे कनेक्शन निघत असून सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना सुरू झाला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर थेट आरोप होत आहे. दरम्यान भुसे यांनी नाशिकला (Nashik) बैठक घेऊन पोलीस प्रशासनाला ८ दिवसांचे अल्टीमेटम देऊन कारवाई करण्याचा दम भरल्यानंतर पोलीस अधिकार्यांसह सेवकांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने नाशिककर खुश झाले असून अशीच ‘पोलिसींग’ हवी, अशी भावना व्यक्त होत आहे...
अवैध धंदे व गैरप्रकारांविरोधात रस्त्यावर उतरून कारवाई (Action) करा, त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देतो. आपल्या कामात बदल न झाल्यास अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली करणार असा दम नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी १७ ऑक्टोबरला प्रशासनाला दिला होता. तर त्वरीत पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली. याच दिवशी शकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली तर नाशिकरोड भागात तब्बल २ लाखांपेक्षा जास्त रुपयांची जुनी दारु जप्त करण्यात आली. दुसरीकडे मनपाला बरोबर घेऊन अनेक कॅफे सिल करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय परिसरात असलेल्या तंबाखु, सिगारेट विक्रीची दुकाने देखील हटविण्यात आली. यामुळे पोलिसांची (Police) कामगिरी रसत्यावर दिसून आल्याने नाशिककरांनी आनंद व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाने (Thackeray Group) नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढून थेट गृहमंत्र्यांना टार्गेट करीत स्थानिक भाजप, सेनेच्या नेत्यांसह आमदारांवर गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरकीकडे पोलीस सतत कारवाई करत असल्याने गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण झाली आहे. शहरात प्रायव्हसीच्या नावाखाली खोल्या तयार करणार्या काही कॉफी शॉपवर शहर पोलीसांसह नाशिक महापालिकेच्या अधिकार्यांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील काही कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट, पार्टीशन तयार करून तरूण, तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवून त्या ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन व अश्लील कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी होत्या. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केल्यावर एकूण ०८ कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणार्या टवाळखोरांवर देखील पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेत परिमंडळ एकमध्ये २५० तर परिमंडळ दोनच्या हद्दीत ९९ या प्रमाणे ३४९ टवाळखोरांवर पोलिसांनी एकाच दिवशी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी शाळा, महाविद्यालयातील मोकळ्या पटांगणात धुम्रपान करणारे तसेच तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणार्या ३३ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली. तर नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी कारवाई करुन अवैध दारूसाठ्यावर छापा टाकून बंद गाळ्यातून तब्बल २ लाख ३२ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘कोटपा’ नुसार कारवाई
जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या काळात अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भात एकूण १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ५ तसेच शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री व सेवन करणार्यांवर कोटपा कायद्यानूसार एकूण ३५७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई असतांना देखील काही ठिकाणी सर्रास त्याची विक्री सुरू होती. त्यामुळे पोलीस तसेच मनपाकडून विशेष धडक कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले. शहरातील आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कारवाई करुन ३० पानटपर्यांवर कारवाई करून निष्काशित करण्यात आले आहे.