नाशिक । खंडू जगताप

भावाच्या विरोधात चुलत भाऊ, काकाच्या विरोधात पुतन्या घरातच नोतेवाईकांमध्ये होणारी अटीतटीची लढत, खुन्नस, शिगेला पोहचलेला प्रचार, यासाठी घरोघरी तसेच रात्र पार्ट्यांचा वाढलेला जोर अशा ऐन थंडीतही तापलेल्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाल्याचे चित्र नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. विल्होळी ही केवळ प्रातिनिधीक आहे. परंतु जिल्हा तसेच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकींचे चित्र यापेक्षा वेगळे नाही.

नाशिक तालुक्यातील मुंबई - आग्रा महामाार्गावरील विल्होळी हे आठ हजार लोकसंख्या असलेले गाव. मतदार संख्या 3 हजार 228 तर ग्रामपंचायतीच्या 5 वार्डात मिळून सदस्य संख्या 15 या भागातील मोठी ग्रामपंचायत म्हणुन विल्होळीकडे पाहिले जाते.

नाशिक शहरापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हे गाव असल्याने शहरीकरणाचे वारे या गावाला केव्हाच लागले आहे. गावच्या परिसरात असलेल्या विविध कंपन्या, मॉल यामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखोच्या घरात उत्पन्न मिळते. यामुळे तसेच मोठे गाव म्हणुन खासदार आमदारांची मेहरनजर यामुळे गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाल्याचे चित्र आहे.

गावाच्या परिसरात तसेच जवळच्या अंबड, गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्या यामुळे गावातील बहूतेकांना रोजगाराची चांगली उपलब्धता आहे. तर गावाच्या मधून गेलेला महामार्ग यामुळे हॉटेलसह अनेकांचे लहान मोठे व्यावसाय बहरले आहेत.

एकंदर गावाला व ग्रामस्थांना चांगले चलन मिळत असल्याने अनेकांच्या खिशात पैसा खुळखुळत आहे. यामुळे पैशांबोबरच मानपानासाठी निवडणुकीत उतरणारांची संख्या वाढत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत 15 जागांसाठी विविध चार पॅनलद्वारे 36 उमेदवार निवडणुक रिंगणात ऐकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. यातील वार्ड क्रमांक 2 व 3 मधे विरोधात अर्जच दाखल न झाल्याने दोन महिला बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

उर्वरीत चारही पॅनलमध्ये त्या त्या वार्डातील आरक्षणानुसार उमेदवार उभे केल्याने अनेक नवख्यांनाही संधी मिळाली आहे. अनुसुचीत जाती, जमाती अशा प्रवर्गातील राखी जागांमुळे या प्रवर्गातील युवक, महिला लाजत का होईना प्रचार करताना दिसत आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये होणारा प्रचार हा इतर निवडणुकांपेक्षा वेगळा तसेच वैयक्तीक भेटीगाठींवर अधिक चालतो. असे असले तरी आपल्या पॅनलची ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक पॅनलने गावातील मुख्य मंदिर, ग्रामदेवता यांना प्रचाराचे नारळ वाढवून गर्दी करत शक्ती प्रदर्शनही केले जात आहे. पॅनचे उमेदवार प्रत्येक उमेदवाराच्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.

तर अनेक ठिकाणी वडीलधारी, नातेवाईक वैयक्तीक पै पाहुण्यांची भेट घेऊन मतदानाची याचना करत आहेत. गावकीत अनेक जवळचेच नातेवाईक असल्याने अशांची दोन्हीकडून गोची होताना दिसत आहे. दोघांना राग नको घरातील मतदान दोघांना समान करू असेही नागरीक सांगून सुटका करून घेताना दिसत आहेत.

या प्रचारासह कार्यकर्ते, पॅनलमधील प्रमुख पदाधिकारी यांना रोज रात्री ओल्या पार्ट्यांचा दणका चालू आहे. प्रत्येक वार्डात मटण पार्ट्या झोडल्या जात आहेत. युवकांना पाहिजे ते पुरवले जात असल्याने दिवसभर अनेक युवक नशेत असल्याचे वेगळे चित्रही पाहण्यास मिळत आहे.

झेंडे युवक, महिलांच्या हाती

गावा गावातील पारंपारीक गट तट, राजकारण यास वैतागलेल्या तरूणांनी ही निवडणुक हातात घेतल्याचे चित्र आहे. तर जुन्या जानत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक आपले नशीब अजमाताना दिसत आहेत. विल्होळी ग्रामपंचायतीच्या 36 पैकी 20 उमेदवार युवा आहेत. तर 36 पैकी 15 महिला उमेदवार आहेत. जवळपास पन्नास टक्के जागांवर महिला लढत देत आहेत. युवक तसेच महिलांची विकासाची स्वप्ने वेगळी असून युवकांना स्पर्धा परिक्षा, अधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा, साहित्य तसेच डिजीटल विकास हवा आहे. तर महिलांना महिलांचे मुलभूत प्रश्न, आरोग्य व समान अधिकार हवे आहेत. यामुळे सावित्रीच्या लेकी गावकीच्या राजकारणातही मागे नसल्याचे चित्र आहे.

पक्षीय राजकारण गावकुसाबाहेर

विधारसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे करिष्मे चालतात परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारण कुचकामी ठरत असल्याचा प्रत्यय येतो. माजी सरपंच, माजी सदस्य, युवा कार्यकर्ते यांनी राजकीय जोडे बाजुला ठेवून पॅनल तयार केले आहेत. यात गावकीचे राजकारण, मोठी कुटुंबे, भावकीचे मतदान, मित्र परिवार, नातीगोती यावर भर देऊन शपथा तर अगदीच देवाच्या अनाभाका देऊन मत मागीतले जात आहे. यामुळे राजकीय पक्षांना या ठिकाणी थारा नाही. हे राजकारण गावकुसाबाहेरच ठेवले जात असल्याचे चित्र आहे.

डिजीटल प्रचार

निवडणुक कुठलीही असो दुर्गमातील दुर्गम गावात आता युवक व ग्रामस्थांच्या हाती सोशल मिडीया आला आहे. यामुळे आतापर्यंतचा गावातील पारंपारीक प्रचार सुरू असतानाच सोशल मिडीयातून डिजीटल प्रचसार करण्यात युवा वर्ग आघाडीवर आहे. संपुर्ण गावांमधील नागरीकांचे अनेक ग्रुप तयार करण्यात आले आहेत. निवडणुकीतील प्रत्येक घडामोड यावरून प्रत्येकापर्यंत पोहचत आहेत. अनेकांनी पॅनल, वैयक्ती उमेदवार, विकास कामांबरोबर फोटो तसेच मोबाईलमध्येच बॅनर बनवून सातत्याने विविध ग्रुपवर अपलोड केले जात आहे. ज्या उमेदवारांच्या खिशात पैसा खुळखळत आहे अशांनी शहरात जाऊन आपल्या छबीसह विकास कामांचे उडत्या चालीच्या गाण्यांवर व्हिडीओ बनवून ग्रुपवर प्रसारीत केले जात आहेत. यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे.

डिजीटल विकासाचे स्वप्न

गावाचा इतर अंगावने विकास झाला आहे. आता गावाला, तरूणाईला डिजीटल विकास हवा आहे. ज्यामध्ये अधुनिक तंत्रज्ञान, ज्ञानाची उपलब्धता, स्पर्धा परिक्षांसाठी डिजीटल अभ्यासिका, डिजीटल अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, क्रीडा तंत्रज्ञान, आरोग्याच्या सुविधा अशा विकासाचे युवकांचे स्वप्न घेऊन आम्ही युवक निवडणुक लढवत आहोत.

- स्वप्निल झुरडे, उमेदवार

आता महिला नेतृत्व

प्रामुख्याने गावांमधील पारंपारीक राजकारणात महिलांना दुय्यम स्थान मिळत आले आहे. त्यांच्या प्रश्नांनाही दुय्यम स्थान दिले. आता यात परिवर्तन झाले पाहिजे. महिला प्रश्नांना प्राधान्य मिळाले पाहिजे यामुळे महिलांची बाजु आता आम्ही महिलाच सक्षपणे मांडू यासाठी आम्हाला लढायचे आहे.

- जयश्री अंडे, उमेदवार

युवा पिढीला संधी हवी

आतापर्यंत पारंपारीक गट तटा यामध्ये निवडणुका झाल्या, पॅनलीची गरज म्हणून अशिक्षीतांना उमेदवारी देण्यात आली. अनेकांना ग्रापंचायतीची कामेच माहिती नाहीत. यामुळे त्या तुलनेत गावचा विकास झालेला नाही. यासाठी सुशिक्षीत युवा पिढीला संधी मिळाली पाहिजे. युवा पिढी खरा विकास दाखवून देईल

- शंकर हांबरे, ग्रामस्थ

गट तट विसरून कामे व्हावी

राजकारण, गट तट सोडून गावाच्या विकासासाठी निवडणुक झाली पाहिजे. आता युवा पिढी अभ्यासु आहे. शहरातून त्यांना विकास कसा करावा याची माहिती झाली आहे. यामुळे युवकांना संधी दिली तर ते कामे करून दाखवतील.

- माधव आचारी, ग्रामस्थ