करंजवनमधून पाणीपुरवठ्याला हिरवाकंदील

करंजवनमधून पाणीपुरवठ्याला हिरवाकंदील

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाड शहराचा ( Manmad City ) पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने करंजवन धरणातून थेट मनमाडला पाणी पुरवठा ( Water Supply ) करण्यास प्रास्तवित असलेल्या योजनेला हिरवाकंदील दिला आहे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान ( Maharashtra Suvarna Jayanti Nagarotthan Maha Abhiyan )अंंतर्गत ही योजना होणार आहे. त्यासाठी 240 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande )यांनी दिली.

आ.कांदे म्हणाले की, करंंजवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनमाडकरांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. आगामी काळात मनमाडची पाणीटंचाईतून सुटका होइल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला

या योजनेची माहिती देतांना आमदार कांदे म्हणाले, जिल्ह्यात मालेगावनंतर सर्वात मोठे मनमाड शहर असून रेल्वेचे जंक्शन, इंधन कंपन्यांचे डेपो, भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठविणारे गोदाम, ब्रिटिशकालीन रेल्वेचा वर्कशॉप आदीमुळे मनमाड शहराचे एक आगळीवेगळी ओळख असली तरी पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनदेखील या शहराला ओळखले जाते गेल्या 35 ते 40 वर्षांपासून शहरातील नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे.

पाण्याअभावी या शहराचा विकास खुंटला आहे. नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकीत पाणीटंचाई हा प्रमुख मुद्दा असतो.जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आम्हाला निवडून द्या तुमचा पाणीप्रश्न सोडवतो असे आश्वासन दिले होते पाणी समस्या आज ही कायम आहे. दोन वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला निवडून द्या, तुमचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो असे वचन दिले होते. योजना मंजूर झाल्याने हा शब्द अखेर खरा ठरल्याचे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com