जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
नाशिक

जिल्हा परिषद सेवक बदल्यांना हिरवा कंदील

३१ जुलै पर्यंत करण्याचे आदेश

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या कऊ नये, असे शासनाचे आदेश होते. मात्र, आता शासनाने जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण कार्यरत असलेल्या पदाच्या १५ टक्के सेवकांच्या बदल्या ३१ जुलै पर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, सेवकांनी तयारी सुरू केली आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (दि.७) आदेश काढले. रात्री उशीरा हे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चारमधील सेवकांची बदल्यांची प्रक्रिया पार पडते. त्यानुसार जि.प. प्रशासनाने यंदाही बदलीपात्र सेवकांकडून आवश्यक ती माहिती जमा करून बदल्यांची तयारी केली होती. मात्र, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने ४ मे रोजी आदेश काढून सेवक बदली प्रक्रीया राबवू नये, असे आदेश काढले होते. करोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याने सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी, सेवकांची बदली करण्यात येऊ नये , असे आदेशात म्हटले होते. मात्र, अपंग, विशेष बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे केली होती.बदल्या रद्द झाल्याने पेसा अंतर्गत सेवकांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. परंतू, शासनाने आता सेवक बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत.

३१ जुलै २०२० पर्यंत त्या-त्या संवर्गातील एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढया मर्यादेत सर्वसाधारण बदल्या करण्यात याव्यात. तसेच सर्वसाधारण बदल्यां व्यातिरिक्त काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे बदल्या करावयाच्या असल्यास त्या देखील बदल्या ३१ जुलै पर्यंत करण्यात याव्यात,असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव गीता कुलकर्णी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

आदेश प्राप्त झाल्यानंतर बदलीपात्र सेवकांनी समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे, करोनाचे कामे सुरू असताना आता सेवक बदली प्रक्रीया राबववी लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com