कचर्‍याच्या डोंगरावरील ‘हिरवळ’ सुकली!

प्रशासनाचे दुर्लक्ष; खतप्रकल्प सुशोभिकरणाची ‘शोभा’
कचर्‍याच्या डोंगरावरील ‘हिरवळ’ सुकली!

नवीन नाशिक । निशिकांत पाटील New Nashik

मुंबई-आग्रा महामार्गलगत नाशिकच्या प्रवेशद्वाराजवळच्या खतप्रकल्पातील कचर्‍याच्या डोंगरावर हिरवळ (लॉन) लावून सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र नव्याच्या नऊ दिवसांप्रमाणे कचर्‍याच्या डोंगराची अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते हिरवे सौंदर्य लोप पावत आहे. नाशिकचे सौंदर्य वाढवणार्‍या या प्रकल्पाचे भविष्यात काय होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

पाथर्डी शिवारातील खतप्रकल्प परिसरात कचर्‍याचा डोंगर उभा राहिला आहे. त्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

यांच्या संकल्पनेतून येथील कचर्‍याच्या ढिगावर हिरवळ लावून सुशोभीकरण करण्यात आले. त्यात भर टाकणारी झाडेही लावण्यात आली. येथील डंपिंग ग्राउंडवर केपिंग करून कचर्‍याच्या डोंगरावर तीन थर लावण्यात आले.

पहिल्या थरावर जियो सिंथेटिक क्ले, दुसर्‍या थरावर जियो नेट तर तिसर्‍या थरावर जियो टेक्चर करण्यात आले. त्यावर दीड फूट मातीचा थर दिला गेला. त्यावर लॉन व शोभेची झाडे लावली गेली. सुरुवातीला त्याकडे मनपा प्रशासनाने चांगले लक्ष पुरवले. हिरवळ फुलवली. मात्र जसा-जसा काळ लोटला तस-तसा नाशिकचा हा ‘स्वप्न प्रकल्प’ दुर्लक्षित होत गेल्याचे अनुभवास येत आहे.

सध्या पावसाळा असूनदेखील येथील हिरवळ अदृश्य होत आहे. त्याऐवजी गाजर गवताचे साम्राज्य वाढत आहे. मनपा प्रशासनाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे व नाशिक शहराचे सौंदर्य वाढवणार्‍या हिरवळीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

फिरण्याऐवजी दुर्गंधीचे संकट

नाशिककरांना अवघ्या सहा महिन्यांतच येथील हिरवळीवर फिरण्याची सुविधा उपलब्ध होणार असे तत्कालीन आयुक्तांनी सांगितले होते. मात्र वर्षापेक्षा जास्त काळ उलटूनसुद्धा खतप्रकल्पाच्या डोंगरावरील हिरवळीचे कामदेखील पूर्ण झालेले नाही. येथे पडणार्‍या कचर्‍याचा दुर्गंध महामार्गासह नवीन नाशिक परिसरापर्यंत पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com