महाशिवरात्रीची जय्यत तयारी

महाशिवरात्रीची जय्यत तयारी

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

दोन वर्षाच्या करोनाच्या कालावधीनंतर यंदा महाशिवरात्री (Mahashivratri )महोत्सव अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्याची तयारी पंचवटी परिसरातील सर्व शिवमंदिरात शिवभक्तांनी केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष व त्यापेक्षा अधिक काळ सर्वच मंदिरे भाविकांसाठी बंद होती, त्यामुळे कोणालाही दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. यंदा मात्र सर्वच शिव मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे.

संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिक मधील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कपालेश्वर मंदिरात ( Kapaleshwar Temple)महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याचा अंदाज लक्षात घेता महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिर रात्री 12 पर्यंत खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.महाशिवरात्री उत्सव नियोजनाच्या दृष्टीने बुधवारी कपालेश्वर मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महाशिवरात्री दिवशी भाविकांना रामकुंडा समोरील प्रवेशद्वारातून प्रवेश मिळेल तर मंदिराच्या मागील बाजूने बाहेर पडण्यासाठी मार्ग असणार आहे .

रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार असून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून महाशिवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर यांच्यासह शहरातील सर्वच शिवमंदिर दर्शनासाठी गर्दी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती .

यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता गरजेचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली .महाशिवरात्रीला मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची देखील सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शनिवारी 4 वाजता भव्य पालखी काढण्यात येणार असल्याने तयारी सुरू आहे. विविध सामाजिक संस्था मंडळांच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्त समितीचे भाऊसाहेब गंभीरे, मंडलेश्वर काळे, प्रमोद देसाई, गुरव, पूजा अधिकारी आदी उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. रामकुंड परिसरात शनिवारी वाहतूक बंद असणार आहे. तसेच वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत देखील घेतली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com